मुंबई: धुम्रपान केवळ तुमच्या आरोग्यासच धोकादायक नाही. तर नोकरी आणि कमाईवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. धूम्रपान करणारी व्यक्तीची कमाई धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीपेक्षा कमी असते. असं एका नव्या संशोधनात समोर आलं आहे.

 

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील सहाय्यक प्रोफेसर आणि संशोधनाचे प्रमुखे जूडिथ प्रोचास्का यांच्यानुसार, "धुम्रपानापासून होणारे आजार गेल्या अनेक वर्षापासून समोर येत आहेत. पण या संशोधनाच्या निष्कर्षानुसार, धुम्रपानामुळे आर्थिक हानीही होते."

 

या संशोधनासाठी जूडीय आणि त्यांच्या टीमनं 131 बेरोजगार धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती आणि 120 बेरोजगार धुम्रपान न करणाऱ्या व्यक्ती या दोघांवर एक वर्षभर अभ्यास केला. त्यानंतर सहाव्या आणि 12 व्या महिन्यानंतर त्याचं आकलन करण्यात आलं.

 

जूडिथ यांच्या मते, धुम्रपान करणाऱ्या आणि न करणाऱ्यांमध्ये अनेक गोष्टींमध्ये बराच फरक आढळून आला. धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती या शिक्षण, वय आणि आरोग्य याबाबतीत धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तीपेंक्षा फारच मागे असतात. त्यामुळे अशा व्यक्तींना नोकरी शोधताना फारच त्रास होतो. त्यांच्या कमाईवर त्याचा परिणाम होताना दिसून येतो आहे.

 

निष्कर्षानुसार, धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना नोकरी मिळविण्यासाठी बरीच धडपड करावी लागते. त्यामुळेच धुम्रपान करण्याआधी याचा नक्की विचार करा.

 

हे संशोधन अमेरिकेतील मासिक 'जेएएमए'मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.