नवी दिल्ली : तुम्ही वीकेंडला अधिक झोप घेता? तर सावधान... कारण सुट्टीच्या दिवशी अधिक झोपणं तुमच्या आरोग्याला धोकादायक ठरु शकतं. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, सुट्टीच्या दिवशी अधिक झोपल्याने हृदयविकाराचे त्रास सुरु होण्याची शक्यता अधिक असते.
वीकेंडला अधिक झोप घेतल्याने हृदयविकाराच्या त्रासात 11 टक्के वाढ होण्याची भीती संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे. या समस्येला ‘सोशल जॅट लॅग’ असं म्हटलं गेलंय. इतर दिवसांच्या तुलनेत एखाद्या दिवशी म्हणजे वीकेंड किंवा सुट्टीच्या दिवशी अधिकची झोप घेतल्यास ‘सोशल जॅट लॅग’चा त्रास होतो.
‘सोशल जॅट लॅग’मुळे केवळ आरोग्याला त्रास होत नाही, तर मूडही खराब होतं. शिवाय, यामुळे निद्रानाश आणि थकवा वाढण्यासारखे त्रासही सुरु होतात.
याच संशोधनात असे समोर आले आहे की, नेहमीच्या झोपेच्या वेळेपेक्षा तुम्ही किती जास्त झोपता, यावरही आरोग्य ठरत असतं. नेहमीच्या वेळेएवढीच सातत्याने झोप घेतल्यास त्याचा हृदयविकार कमी होण्यास मदत होते.
अमेरिकन अकॅडेमी ऑफ स्लीम मेडिसिनने सूचवल्याप्रमाणे, वयस्कर माणसांना सुदृढ राहण्यासाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते.
स्लीप जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात 22 ते 60 वर्षांपर्यंतच्या 984 व्यक्तींचं सर्वेक्षण करण्यात आले. त्यांना त्यांच्या झोपण्याच्या वेळांबद्दल प्रश्न विचारले गेले.
सूचना : हे वृत्त संशोधनाच्या दाव्यावर आधारित असून, एबीपी माझा या दाव्याला दुजोरा देत नाही.