Skin Care Tips : ज्या प्रमाणे आपण आपल्या त्वचेची काळजी घेतो, त्याच प्रमाणे शरीराच्या इतर भागांची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. शरीराचे अनेक भाग काळवंडतात, त्यामुळे ते खराब दिसू लागतात. तसेच, शरीरावर धूळ जमा होऊन, तिथे जंतू देखील साचू लागतात. आपण अंघोळ करताना किंवा ब्युटी ट्रीटमेंट घेताना केवळ चेहऱ्याच्या सौंदर्याची काळजी घेतो. मात्र, शरीराचे काही भाग या ब्युटी ट्रीटमेंटमध्ये किंवा इतर वेळी देखील विसरले जातात. मान हा देखील शरीराचा असा भाग आहे, जो स्वच्छतेच्या किंवा सौंदर्याच्या बाबतीत दुर्लक्षित केला जातो.


घाम आणि सतत उन्हाचा मारा झाल्यामुळे मान काळवंडते. मानेवरचा काळवंडलेपणा दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रोडक्ट उपलब्ध आहेत. पण, प्रत्येकवेळी हे प्रोडक्ट काम करतीलच असे नाही. या उत्पादनांच्या वापरामुळे अनेक समस्या देखील उद्भवतात. अशावेळी काही घरगुती उपाय वापरून आपण हा काळवंडलेपणा दूर करू शकतो. चला तर जाणून घेऊया...


काकडी, कोरफड जेल, गुलाब पाणी पॅक


साहित्य : 2 मोठे चमचे काकडीचा रस, 1 चमचा कोरफड जेल, एक छोटा चमचा गुलाब पाणी


कृती : एका वाटीत या तीनही गोष्टी व्यवस्थित एकत्र मिसळा. हा पॅक कापसाने मानेवर व्यवस्थित लावा. लवकर परिणाम दिसावा म्हणून हा पॅक रात्री झोपताना लावावा. रात्रभर ठेवा आणि सकाळी धुवून टाका. नियमित हा पॅक लावल्यास लवकर परिमाण दिसून येईल.


हळद, बेसन आणि दही पॅक


साहित्य : 1 मोठा चमचा बेसन, 1 चमचा दही, चिमुटभर हळद


कृती : एका वाटीत या तीनही गोष्टी व्यवस्थित एकत्र मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेवर लावा आणि काहीवेळाने धुवून टाका. याच्या नियमित वापराने मानेवरचा काळपटपणा निघून जाईल.


टोमॅटोचा रस आणि कॉफी पावडर पॅक


साहित्य : 1 मोठा चमचा टोमॅटोचा रस, 1 छोटा चमचा कॉफी पावडर


कृती : 1 मोठा चमचा टोमॅटोच्या रसात कॉफी पावडर मिसळून त्याचा स्क्रब पॅक तयार करा. या स्क्रबने मान व्यवस्थित घासा. दोन ते तीन मिनिट मसाज केल्यानंतर धुवून टाका.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :