Scientists Predict About Breakups : सर्व काही ठीक चाललं होतं. लवकरच दोघेही लग्न करणार होते. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण अचानक एक दिवस दोघांचं ब्रेकअप झालं. लग्नापर्यंत गेलेल्या गोष्टींना एक दिवस अचानक पूर्णविराम मिळाला. हे कसं घडलं काहीच कळायला मार्ग नव्हता. कोणाला काहीच समजत नव्हतं? असं का झालं? दोघांचं वेगळं होण्याचं नेमकं कारण काय? दोघांनाही माहीत नव्हतं. अशी परिस्थिती अनेकांच्या आयुष्यात येते. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्तींचं अचानक ब्रेकअप होतं आणि त्यांचं आयुष्य बदलून जातं. पण तुम्हाला जर कोणी सांगितलं की, तुमचं ब्रेकअप होणार आहे, याचे संकेत तुम्हाला तीन महिन्यापूर्वीच मिळतात, तर तुम्ही विश्वास ठेवाल? पण हे खरंय.
जर तुमचं ब्रेकअप (Breakup) होणार असेल, तर त्याचे संकेत तुम्हाला तीन महिन्यांपूर्वीच मिळतात. याचं कारण शास्त्रज्ञांना सापडलं आहे. हो खरंच, शास्त्रज्ञांनी केलेल्या एका वेगळ्या संशोधनातून आता ब्रेकअप होण्यापूर्वी तीन महिने आधीच दोघांनाही ब्रेकअपची पूर्वकल्पना मिळते, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे.
संशोधकांकडून Reddit युजर्सच्या पोस्टवर अभ्यास
ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी 6803 Reddit युजर्सच्या 1,027,541 पोस्टचा अभ्यास केला. या लोकांनी Subreddit पोस्ट r/Breakups संदर्भात पोस्ट केल्या होत्या. याचा अर्थ त्यांचा आता ब्रेकअप होणार आहे किंवा होत आहे. यामध्ये पोस्ट महत्त्वाची नाही, तर या युजर्सनी पोस्ट करताना जी भाषा वापरली आहे, ती महत्त्वाची आहे. ब्रेकअप हा शब्द मनात येताच पोस्टच्या भाषेत बदल झाल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं आहे.
पोस्टच्या भाषेवरुन ब्रेकअप होण्याचे संकेत?
संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा अहवाल नुकताच 'प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. संशोधकांनी ब्रेकअपच्या दोन वर्षांपूर्वी आणि दोन वर्षांनंतरच्या पोस्ट्स पाहिल्या. यादरम्यान संशोधकांना पोस्टच्या भाषेत बदल आढळून आला. ज्या व्यक्तीचं ब्रेकअप होणार आहे, त्याची भाषा तीन महिन्यांपूर्वीच बदलल्याचं संशोधकांना संशोधनादरम्यान आढळून आलं. तेच ब्रेकअप झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत मात्र भाषेत कोणताही बदल झाला नाही.
भाषेत मी, आपण अशा शब्दांचं प्रमाण वाढल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं. मात्र, जे माणूस स्वतःसाठी वापरतो, अशा शब्दांचं प्रमाण वाढतं. ज्यामधून त्या व्यक्तीचं टेन्शन दिसतंय. त्यामुळेच अशी भाषा वापरली जाते, ज्यातून अनेक अर्थ काढता येतात. लोकांची विश्लेषणात्मक विचारशक्ती कमी होते. एखादी व्यक्ती अधिक वैयक्तिक आणि अनौपचारिक भाषा बोलू किंवा पोस्ट करु लागते.
यासंदर्भात उदाहरण द्यायचं झालं तर, उदाहरणार्थ.... "मला माझी गोष्ट सांगावी की, नाही हे माहित नाही. मला मदत हवी आहे, कारण मला हरवल्यासारखंय वाटतं. पण माझी कहाणी खूप मोठी आहे, ती शेअर करणं योग्य ठरेल की, नाही हेही मला माहीत नाही.", असे बदल सामान्यतः जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी त्यांच्या नातेसंबंधाबद्दल बोलते. पण जेव्हा त्यांचा विचार बदलतो, किंवा बदलणार असतो... तेव्हा या व्यक्ती अशी भाषा वापरतात.
संशोधनातील प्रमुख संशोधक सारा सेराज यांनी सांगितलं की, लोकांना आधीच माहीत असतं की, त्यांचं ब्रेकअप होणार आहे. पण अशा व्यक्ती त्यांच्या भाषेकडे कधीच लक्ष देत नाहीत. त्यांच्या आयुष्यावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊ लागतो. आपण किती वेळा प्रिपोजिशन, आर्टिकल्स किंवा प्रोनाऊंसचा वापर करतो, याकडे आपण लक्ष देत नाही. पण आपल्या सामान्य भाषेत त्याचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे तुमची मानसिक स्थिती कळून येते.