मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होते. पण बऱ्याचदा सोनं खरेदी करताना फसवणूक होण्याची मोठी शक्यता असते. सोनं खरेदी करताना तुमची फसवणूक होऊ नये यासाठी पुढील 5 गोष्टी जरुर लक्षात ठेवा.

1. सोन्याची शुद्धता : शुद्ध सोन्यासाठी कॅरेट हे मापक आहे. 24 कॅरेट सोनं हे सर्वात शुद्ध सोनं समजलं जातं. पण 24 कॅरेटचं सोनं दागिने बनविण्यासाठी करता येत नाही. दागिने तयार करताना 22 कॅरेट सोन्यासोबत 2 कॅरेट चांदी मिक्स केली जाते. त्यामुळे एक गोष्ट जरुर लक्षात घ्या की, तुम्ही जे काही सोनं खरेदी कराल ते 22 कॅरेटपेक्षा कमी असता कामा नये.



2. शुद्ध सोनं ओळखण्याच्या पद्धती : सोनं खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी भारत सरकारकडून इंडियन स्टँडर्ड ऑफ ब्युरोची स्थापना करण्यात आली आहे.  इंडियन स्टँडर्ड ऑफ ब्युरो हे खऱ्या सोन्याची ओळख पटावी यासाठी त्यावर शुद्धतेचं मापक समजलं जाणारं हॉलमार्क लावतं. त्यामुळे सोनं खरेदी करण्याआधी त्यावर हॉलमार्क आहे की, नाही हे तपासून पाहा

3. तुम्ही गोल्ड कॉइन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याच्या पॅकेजिंगकडे जरुर लक्ष द्या. गोल्ड कॉइनची पॅकेजिंग पहिल्यापासून खुली असता कामा नये. त्याची पॅकेजिंग हीच त्याच्या खरेपणाची मोठी ओळख आहे.



4. बाजारात सोन्याची नाणी ही 0.5 ग्रामपासून 50 ग्रामच्या वजनापर्यंत उपलब्ध आहेत. 16 ऑक्टोबरला बाजारात सोन्याचा दर हा 30,850 रुपये आहे.

5. सोन्याचे दर हे दररोज बदलत असतात. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करत आहात त्या दिवशी सोन्याचा दर किती आहे याची खात्री करुन घ्या.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (पीएमएलए)च्या अंतर्गत रत्न आणि सोन खरेदीवर 2 लाखांपर्यंत पॅन सूट देण्यात आली आहे. म्हणजेच 2 लाखांच्या पुढे जर सोनं खरेदी केलं तर पॅन कार्ड देणं गरजेचं आहे.