Vasu Baras 2023 : आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिवाळी (Diwali 2023). खरंतर या दिपावली सणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत असतो. दिवाळीच्या सणाला अवघे काही दिवस राहिले आहेत. अशा वेळी दिवाळी नेमकी साजरी कशी करायची? आणि या इंग्रजी महिन्यात ही दिवाळी कोणत्या दिवसापासून सुरु होते आणि कशा पद्धतीने साजरी करावी? दिवाळीचा पहिला दिवस कोणता? याच संदर्भात सविस्तर माहिती सोलापुरातील प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे. ती समजून घेऊयात.
पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितल्याप्रमाणे, यावर्षी दिवाळीची पहिली पणती लावावी ती वसुबारसच्या (Vasubaras) दिवशी. 9 नोव्हेंबरला वसुबारसा सण साजरा करावा. गाईचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहित आहे आणि म्हणून गाईचं पूजन करणं महत्त्वाचं आहे. वसुबारसच्या दिवशी वासरासह असलेल्या गाईचं पूजन करावं. गाईच्या पायावर पाणी घालणे. तिला ओवाळणे. तिला गंध लावणे, चारा खायला घालणे आणि तिचा सांभाळ करणारा जो गोपालक आहे त्याला धान्य देणे काही दक्षिणा देणे अशा प्रकारचा हा छोटासा विधी आहे.
वसुबारस (गोवत्स द्वादशी) - गुरूवार 9 नोव्हेंबर
मुहूर्त - सायंकाळी 05.31 मिनिटे ते 08.09 मिनिटांपर्यंत
काय आहे वसुबारसची प्रथा?
या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी हिंदू परंपरेनुसार, गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावे म्हणून वसुबारसची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे हा अत्यंत साधा विधीपूर्वक करण्याचा हा दिवस आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :