Ganesh Visarjan 2023 : यंदा 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi 2023) सण साजरा करण्यात आला, भाविकांनी मोठ्या थाटामाटात घरोघरी गणपतीचे स्वागत केले. हा उत्सव 10 दिवस साजरा केला जात असून लोक त्यांच्या भक्तीनुसार दीड दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस गणपतीची पूजा करतात. यानंतर विधीप्रमाणे त्यांचे विसर्जन केले जाते. यावर्षी 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. हिंदू धर्मात गणपतीला पहिले पूजनीय देवता मानले जाते, मग अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशाचे विसर्जन का केले जाते? यामागे दडलेली पौराणिक कथा जाणून घ्या.



गणेश विसर्जन पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे पाण्यात विसर्जन केले जाते कारण ते जल तत्वाचे अधिपती आहेत. पुराणानुसार, वेद व्यासजी गणपतीला महाभारत सांगत होते आणि बाप्पा ते सलग लिहीत होते. कथा सांगताना वेद व्यासजींनी डोळे मिटले. आणि ते सलग 10 दिवस महाभारत पुराण सांगत राहिले, तोपर्यंत बाप्पा ते लिहीत राहिले. पण दहा दिवसांनी जेव्हा वेद व्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे. गणेशाचे शरीर थंड करण्यासाठी, वेद व्यासजींनी त्याला पाण्यात आंघोळ घातली, ज्यामुळे बाप्पाचे शरीर थंड झाले. तेव्हापासून गणेश विसर्जन हे गणपतीच्या शरीराला थंड करण्यासाठीच केले जाते, अशी समजूत आहे.



पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण


दुसर्‍या आख्यायिकेनुसार, श्रीगणेश आपला भाऊ कार्तिकेयच्या ठिकाणी काही दिवस राहण्यासाठी दक्षिणेला गेले आणि तिथल्या सर्वांना मोहित केले. त्यानंतर 10 दिवसांनी ते तेथून आपल्या निवासस्थानासाठी निघाले. त्यावेळी भगवान कार्तिकेयासह सर्वजण खूप भावूक झाले आणि त्यांनी गणपतीला पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले. असे म्हटले जाते की, या आख्यायिकेनुसार गणेश विसर्जनाचा सण साजरा केला जातो आणि गणपतीला पुढील वर्षी पुन्हा सुख, समृद्धी आणि आनंदाने आपल्या घरी येण्याची प्रार्थना केली जाते.


 


गणेश विसर्जन शुभ मुहूर्त
10 दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जनाने होणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 27 सप्टेंबर रोजी रात्री 20 वाजून 18 मिनिटांनी सुरू होईल, तर 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 49 मिनिटांनी समाप्त होईल. उदयातिथीनुसार गणेश विसर्जन 28 सप्टेंबर, गुरुवार रोजी होणार आहे. 28 सप्टेंबरला सूर्योदयानंतर गणेश विसर्जन सुरू होईल. 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Ganesh Chaturthi 2023 : आजही 'या' गुहेत श्रीगणेशाचे मूळ शीर आहे सुरक्षित? जाणून घ्या यामागील रहस्य