Pandharpur Ashadhi Wari 2023 : यंदा आषाढी यात्रा (Ashadhi Wari) विक्रमी भरणार असताना प्रशासन देखील अंग झटून कामाला लागलं आहे. भाविकांच्या जीवाला धोका होऊ शकणाऱ्या शहरातील 115 इमारतींना पालिकेनं नोटीस बजावल्या आहेत. आषाढीसाठी यंदा 20 लाखांपेक्षा जास्त भाविक येण्याचा अंदाज असताना या भाविकांच्या निवासाची व्यवस्था अतिशय तोकडी असते. अशावेळी हे भाविक मंदिर परिसरातील शेकडो जुन्या घरांतून यात्रा कालावधीमध्ये निवास करत असतात. मात्र या मंदिर परिसरातील काही वाडे आणि धर्मशाळा जुन्या झाल्या असल्यानं भाविकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या आदेशानुसार शहरातील धोकादायक बनलेल्या इमारतींचं सर्वेक्षण नगरपालिकेच्या पथकाकडून सुरु करण्यात आलेलं आहे.
धोकादायक असणाऱ्या इमारतींवर नोटीस लावण्यात येत असून या ठिकाणी भाविकांनी वास्तव्य करू नये, अशा सूचना पालिकेकडून देण्यात येत आहेत. धोकादायक झालेल्या इमारतींपैकी काही इमारतींची दुरुस्ती घर मालकाकडून सुरू करण्यात आली असून यावर देखील पालिका प्रशासन लक्ष ठेऊन आहे. अति धोकादायक असणाऱ्या इमारती नागरपालिकेकडून उतरवून घेण्यात आल्या असून अशा इमारतीमध्ये भाविकांनी निवास करू नये, असं आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केलं आहे.
पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी टोल माफ
पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांसाठी शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या गाड्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. टोलमाफीचे स्टीकर्स हे पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्यांमधून देण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी पांढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांसाठी, वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, त्यांच्या वाहनाांना टोल माफ करण्याबाबत राज्य सरकारने 1 जून 2023 रोजी निर्णय घेतला होता. त्याच अनुषंगाने आज सार्वजनिक बांधकाम विभागाने टोलमाफीबाबतचे आदेश जारी केले आहेत. गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स पुरवण्याचे निर्देश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत.
वारी झाली हायटेक! पालखी रथाला जीपीएस सिस्टीम अन् CCTV
सगळ्या वारकऱ्यांना आता आषाढी वारीची आस लागली आहे. उद्या देहूच्या संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे तर 11 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आळंदीतून प्रस्थान होणार आहे. मात्र जसंजसं तंत्रज्ञान वाढत आहे तसंतसं वारीला देखील परंपरेसोबतच तंत्रज्ञानाची जोड लागताना दिसत आहे. आषाढी वारी सोहळा दिवसेंदिवस हायटेक होत चालला आहे. याचाच एक भाग म्हणून आता पालखी रथाला आता जीपीएस प्रणाली जोडण्यात आलेली आहे. यामुळं गुगल मॅपद्वारे रथाचे लोकेशन कळणार आहे. सोबतच नऊ सीसीटीव्हीद्वारे फेसबुक लाईव्ह करून घरबसल्या दर्शन ही घेता येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :