पंढरपूर : आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने खुशखबर दिली आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असतानाही मुखदर्शन सुरूच राहणार आहे. शासकीय महापूजेच्या चार तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद करण्यात यायची. त्यामुळे वारकऱ्यांमोठी मोठी गैरसोय व्हायची. कारण रांगेतला कालावधी चार तासांनी वाढायचा. वारकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी यंदा हा निर्णय घेण्यात आला आहे.


आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असताना देखील मुखदर्शन सुरू राहणार आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी रात्री बैठकीत दिले आहेत. आषाढी एकादशीला   मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजता पूजेला येत असतात आणि जवळपास पहाटे पाचपर्यंत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात होत असतो. यावेळी आषाढी सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी व्यवस्था केल्याने पर्वणी काळात  जवळपास दीड ते दोन लाख ज भाविकांना देवाचे मुखदर्शन होणार  आहे.


पूजा सुरू असताना देखील मुखदर्शन देण्याचा  निर्णय


आषाढी एकादशी हा सोहळ्यातील पर्वणीच दिवस असतो. यादिवशी दर्शन मिळावे यासाठी 30-30 तास भाविक दर्शन रांगेत उभारलेले असतात. त्याचवेळी राज्यभरातील आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते व्हीआयपी बनून दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असतात. त्यामुळे रांगेतील शेकडो भाविकांना या पवित्र दिवशी दर्शनापासून मुकावे लागते. याबाबत मुख्यमंत्री शिंदे सरकारने एक धाडसी निर्णय घेत आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असताना देखील मुखदर्शन देण्याचा  निर्णय घेतला आहे. 


मुख्यमंत्र्यांच्या पूजेनंतर कुणालाही VIP दर्शन नाही, पासवर मर्यादा 


राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय जाहीर केल्याने आषाढी एकादशीला केवळ दर्शन रांगेतील भाविकांनाच देवाचे दर्शन घेता येणार आहे. याचसोबत आषाढी एकादशीला मानाच्या दिंड्यांचे देण्यात येणाऱ्या दर्शन पासेसशिवाय कोणतेही व्हीआयपी दर्शन पासेस वितरित करू दिले जाणार नसल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले आहे. यामुळे दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना पहाटेची शासकीय महापूजा संपल्यानंतर दिवसभर विठुरायाचे दर्शन पर्वणी काळात घेता येणार आहे.


घुसखोरी करणाऱ्या तथाकथित राजकारण्यांना  चांगलाच चाप


राज्य सरकारच्या या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून जोरदार स्वागत होत आहे. आषाढी यात्रेला आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना एकादशी दिवशी दर्शन देण्यासाठी झालेला हा निर्णय यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. यामुळे एकादशी दिवशी दिवसभर दर्शनासाठी घुसखोरी करणाऱ्या तथाकथित राजकारण्यांना मात्र चांगलाच चाप बसणार आहे. आषाढी एकादशीला व्हीआयपी बंदीची संपूर्ण व्यवस्था पोलिसांच्या ताब्यात दिली जाणार असल्याने मंदिर प्रशासन देखील यात हस्तक्षेप करू शकणार नाही.