मुंबई : आपल्या सौंदर्यात केसांचा (Hair) अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येकाला आपले केस काळे आणि दाट हवे असतात. विशेषत: तरुण वयात कुणालाही आपले केस पांढरे व्हावे, असे वाटत नाही. पूर्वीच्या काळी साधारण चाळीशीच्या पुढेच लोकांचे केस पांढरे (White Hair) होत असत. मात्र आजकाल तर शाळकरी विद्यार्थ्यांचे देखील केस पांढरे होत असल्याचे दिसून येत आहे. तरुण-तरुणींचे केस लग्नाआधीच पांढरे होत असल्याने त्यांच्या टेन्शनमध्ये अधिकच वाढ होत आहे. 


अविवाहित मुलांच्या डोक्यावर पांढरे केस दिसायला लागले की, ते तणावग्रस्त होतात.  ते पांढरे केस घालवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. यासाठी काही तरुण मंडळी केमिकल बेस्ड हेअर कलर वापरतात. पण, यामुळे केस आणखी खराब होण्याची शक्यता असते. तरुणाईचे केस पांढरे होण्याचे महत्त्वाचे कारण काय आहे आणि ते कमी करण्यासाठी उपाय काय? याबाबत जाणून घेऊयात...


लहान वयात केस पांढरे का होतात? 


डॉ. अनुज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, केस अचानक पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. थायरॉईड रोग आणि व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता, ही सर्वसामान्य कारणे असतात. मात्र, मानसिक ताणतणाव हेदेखील केस पांढरे होण्यामागचे कारण असू शकते. काही संशोधनात असेही समोर आले आहे की, फोन रेडिएशनमुळे केस देखील पांढरे होऊ शकतात. मात्र याबाबत अजून स्पष्टता झालेली नाही. 






'हे' उपाय करा


जर तुम्हाला पांढरे केस कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी काही आवश्यक उपाय करायचे असतील तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आणि खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. तुम्ही दररोज 7 ते 8 तास चांगली झोप घ्यावी. रोजच्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचे प्रमाण वाढवावे. आठवड्यातून एकदा उपवास ठेवावा. थायरॉईड किंवा इतर आजार आढळल्यास त्यावर उपचार करा, अशी माहिती डॉ. अनुज कुमार यांनी एक्स या समाज माध्यमावर दिली आहे. पांढरे केस काळे करण्यासाठी कोणतेही प्रभावी उपचार नाहीत. त्यामुळे बाजारात दिसणारे कोणतेही सीरम किंवा इतर गोष्टी कितपत प्रभावी आहेत याबद्दल शंका असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)


आणखी वाचा 


Men Health : अनेकांचं पालक होण्याचं स्वप्न राहतं अपूर्ण, जेव्हा 'ही' 5 कारणं पुरुषांच्या वंध्यत्वाची समस्या वाढवतात, दुर्लक्ष करू नका