मुंबई: एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीने आपल्या तिकीट दरात मोठ्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने देशांतर्गत विमान प्रवासासाठी आपल्या तिकीट दरामध्ये कपात करून, राजधानी एक्सप्रेसच्या 2 टायर एसीच्या तिकीट दराप्रमाणे करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
तिकीट दर कपातीचा निर्णय हा शेवटच्या रिकाम्या सीट भरण्यासोबतच, दिवसागणिक विमान प्रवासाच्या वाढत्या तिकीट दरांवरून ग्राहकांना दिलासा देण्याचा, असल्याचे एअर इंडियाचे संचालक आणि प्रबंध निदेशक अश्वनी लोहानी यांनी सांगितले.
या निर्णयानुसार, एअर इंडियाच्या दिल्ली-मुंबई, दिल्ली-चेन्नई, दिल्ली-कोलकाता आणि दिल्ली-बंगळुरू आदी मार्गांवरील विमान प्रवासाचे तिकीट दर विमान उड्डाणाच्या चार तास पूर्वी लागू असतील. सध्या दिल्ली ते मुंबईदरम्यान राजधानी एक्सप्रेसच्या 2 टायर एसीचे तिकीट दर 2870 रुपये आहे, तर दिल्ली-चेन्नईदरम्यान राजधानी एक्सप्रेसचे तिकीट दर 3905 रुपये आहेत.
अशाच प्रकारे दिल्ली ते कोलकाता आणि दिल्ली ते बंगळुरू दरम्यानचे तिकीट दर अनुक्रमे 2890 आणि 4095 रुपये आहेत. लोहानीनी सांगितले की, सध्या एअर इंडियाचे 74% सीट या भरल्या जातात. तर प्रमुख मार्गांवरील हा आकडा 80 % आहे.