Navratri Recipe : नवरात्रीची (Navratri 2022) सुरुवात अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून होते. या उत्सवात देवीची पूजा केली जाते. दांडिया, गरबा खेळून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. नवरात्रीमध्ये सातव्या किंवा आठव्या दिवशी कडकण्यांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. कडकण्यांची माळ तयार करुन ती माळ काही लोक घटाला देखील बांधतात. काही लोक नवरात्रामध्ये नऊ दिवस उपवास करतात. त्यामुळे उपवास संपल्यानंतर खुसखुशीत आणि कुरकुरीत असणाऱ्या या कडकण्या चाहासोबत काही लोक खातात. जाणून घेऊयात या चविष्ट कडकण्या तयार करण्याची सोपी पद्धत


कडकण्या तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:


1. पाव किलो मैदा 
2. पाव वाटी रवा
3. 125 ग्रॅम साखर 
4. पाव वाटी तूप 
3. चविप्रमाणे मीठ
4. तळणीसाठी तेल 


कृती:


सर्वप्रथम साखरेची पिठीसाखर तयार करा. त्यानंतर परातीत चाळलेला मैदा घ्या त्यामध्ये बारिक रवा आणि थोडसं मीठ घाला. त्यामध्ये गरम केलेल्या तूपाचे मोहन घाला. हे मिश्रण मिक्स करुन घ्या. त्यानंतर पिठी साखरेमध्ये पाव वाटी पाणी घालून मिक्स करा. हे मिश्रण पिठाच्या मिश्रणात घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून हे सर्व मिश्रण मळून त्याचा एक गोळा तयार करा. दोन तास हा गोळा झाकून घ्या. 


त्यानंतर झाकलेला हा गोळा फूड प्रोसेसरमध्ये घालून मिक्स करा किंवा हातानं मळून घ्या. त्यामुळे हा पिठाचा गोळा मऊ होतो.  या गोळ्याचे लहान अकाराचे गोळे तयार करुन ते गोळे पुरी प्रमाणे लाटा. लाटताना तुम्ही गोळ्याला मैद्याचं पिठ लावू शकता. त्यामुळे गोळा लाटण्याला चिटकणार नाही.


लाटलेल्या कडकण्या एका सूती कापडावर ठेवा. त्यानंतर एका कढईत तेल गरम करुन घ्या. गरम तेलामध्ये लाटलेल्या कडकण्या टाका. कडकण्या या बाहेरील बाजूने लाल झाल्या की लगेच तेलातून काढा. त्यामुळे कडकण्या तेलकट होत नाहीत आणि खुसखुशीत होतात. कुरकुरीत कडकण्या करायच्या असतील तर कडकण्या लालसर होईपर्यंत तेलामध्ये तळा. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :