Makar Sankranti 2021 : मकरसंक्रांत म्हणजे, जानेवारी येणार पहिला सण. हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात मकरसंक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांत असं म्हणतात.


21-22 डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. अर्थातचं त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता 21-22 डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा या राशीला मकर संक्रांती म्हणतात. पंचांगानुसार, मकरसंक्रांतीचा उत्सव 14 जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते.


मकर संक्रातीचा संबंध शेतीशीदेखील आहे. त्यामुळे या दिवशी स्त्रिया एकमेकींना शेतात धान्याचे वाण देतात. या दिवशी स्त्रिया साज-शृंगार करून मंदिरात जातात. तसेच हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.


यंदा मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय?


यंदाच्या वर्षी मकर संक्रांतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.46 हा आहे. इंग्रजी महिन्यानुसार, हा दिवस बहुधा 14 जानेवारी रोजी येतो. परंतु, एखाद्या वर्षी ही तारीख मागे-पुढे होते. हिंदू धर्मामध्ये संक्रांत ही एक देवता मानली जाते. पुराणांनुसार, ही देवता दरवर्षी येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते.


मकर संक्रांत सण दरवर्षी सारख्याच तारखेला येत. हिंदू संस्कृतीतील एकमेव असा सण आहे जो एकाच तारखेला येतो. यामागील कारण म्हणजे, हा एकमेवर सण आहे जो सूर्याच्या स्थानानुसार साजरा केला जातो. इतर सर्व सण हे चंद्राच्या स्थानावर साजरे केले जातात. त्यामुळे इतर सण दरवर्षी वेगवेगळ्या तारखांना साजरे करण्यात येतात.


मकर संक्रातीची पूजा :


मकर संक्रातच्या दिवशी अंघोळ करुन सूर्याला अर्घ्य द्यावे. या दिवशी महिला पूजा करतात. नंतर विवाहित स्त्रिया सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, कच्ची खिचडी, इत्यादी भरतात. हे सुगडं पाटावर ठेवून त्या भोवती रांगोळी काढली जाते. यातील एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीजवळ ठेवलं जातं. त्यानंतर किमान पाच सवाष्णींना वाण देतात. या दिवशी हळदीकुंकू समारंभ करुन तीळगूळ वाटतात. तुम्ही मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू समारंभ करु शकता.