Maghi Ganesh Jayanti 2022: चौदा विद्या, चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या माघ महिन्यातील जयंती उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. विनायक चतुर्थीच्या दिवशी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पुढील काही दिवस गणरायाच्या आगमनाचा उत्साह शहरांमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उत्सवावर कोरोनाचं सावट घोंगावत असल्यानं हा सण साधेपणानं साजरा करण्याचा भाविकांचा कल आहे. मात्र, राज्यभरातील अनेक श्री गणेशाच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केल्याचं समजत आहे.
मुंबई महानगरपालिकेचं भाविकांना आवाहन
माघी गणेशोत्सवासाठी पालिकेने नियमावली जाहीर केली असून कोरोना खबरदारीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले. शिवाय घरगुती मूर्ती दोन फूट, तर सार्वजनिक मंडळांची मूर्ती 4 फुटांपर्यंत असावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. माघी गणेशोत्सवास शुक्रवारी 4 फेब्रुवारीपासून सुरुवात झालीय. मुंबईत सुमारे अडीच हजारे सार्वजनिक मंडळे माघी गणेशोत्सव साजरा करतात. कोविडची तिसरी लाट आटोक्यात आली. मात्र, अजूनही मुंबईत सुमारे एक हजारांपर्यंत कोरोनाबाधित दररोज आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे अनिवार्य असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. कोरोना नियम पाळण्याच्या अटींवर मंडळांना परवानगी दिली जात आहे. मुंबईत सुमारे अडीच हजार मंडळे माघी गणेशोत्सव साजरा करतात. यामध्ये सोसायट्यांतील आणि घरगुती उत्सवांचा समावेश सर्वाधिक असतो. गणेशमूर्तीला फुले अर्पण करणे, प्रसाद वाटणे टाळावे. मंडपात पाचपेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत, आरतीच्या वेळी 10 व्यक्ती उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर मूर्ती आगमन किंवा विसर्जनाची मिरवणूक काढू नये, असं आवाहन पालिकेतर्फे मंडळांना करण्यात आलंय.
ठाण्यात गणरायाचं आगमन
ठाणे पोलिस आयुक्तालय परिमंडळ 1 ते 5 मध्ये 122 सार्वजनिक, तर 1 हजार 347 खाजगी गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. गणेशोत्सवादरम्यान अनेक कार्यक्रमांवर निर्बंध आल्याने, ठाणे शहरात 7 ते 10 दिवस माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या काही मंडळांनी गेल्या वर्षीपासून केवळ दीड, पाच दिवसांचा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यासोबतच घराघरात गणपतीची प्रतिष्ठापना करणाऱ्या भाविकांनी देखील कोणत्याही प्रकारची वाजत-गाजत मिरवणूक न काढता साधेपणाने मिरवणूक काढून गणरायाचे आगमन केले.
मोरगावच्या मयुरेश्वराच्या मंदिरात भाविकांची गर्दी
माघी गणेशोत्सव निमित्त बारामती तालुक्यातील मोरगावच्या मयुरेश्वराच्या मंदिरात भाविकांची गर्दी झाली. अष्टविनायकांमधील पहिला असलेल्या मोरगाव येथिल गणपती मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी दिसत आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त यंदा कोरोनाचे नियम पाळून केला जातोय. एरवी भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. मात्र यावेळी गाभाऱ्यात जाण्यास भाविकांना मज्जाव केला. कोरोनाचे नियमांचे पाळत भाविकांना दर्शन दिले जात आहे. तसेच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लावल्या आहेत
टिटवाळा गणेश मंदिराच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट
प्राचीन गणपती मंदिर असलेल्या टिटवाळा गणेश मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती .गणेश मूर्तीला देखील दागिन्यांनी सजवण्यात आलंय. माघी गणेश जंयती उत्सवानिमित्त गणेश भक्त गणेशाचं दर्शन घेण्यासाठी आज टिटवाळा गणेश मंदिरात सकाळपासून हजेरी लावत दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. त्यामुळं मंदिर आणि परिसर भक्तांनी फुलून गेला होता. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला .आरती झाल्यानंतर भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. कोरोनामुळं यंदा गणेश पालखी सोहळा रद्द करण्यात आला. भक्तांची गर्दी लक्षात घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने खबरदारी घेतली होती.
धुळ्यातील सिद्धेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
धुळे शहरातील अति प्राचीन असलेल्या श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात माघी गणेश उत्सव अर्थात गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली. धुळे शहरातील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर हे पांझरा नदीकाठी वसलेले असून या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माघी गणेश उत्सव अर्थात गणेश जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच मंदिरात गणेश याग 56 भोग महाआरती तसेच भंडारा महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा असं आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं
पुण्यातील दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरात कलावंतांची हजेरी
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच आज 4 फेब्रुवारी 2022 रोजी बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला. मुख्य गणेशजन्म सोहळ्याला आज दुपारी 12 वाजता सुरुवात झाली. यंदा ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक ,स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असं विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलं. पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत आळंदी येथील संत परंपरा असलेले प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, कलावंत गायक अवधूत गांधी यांनी श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केलं. स्वराभिषेकातून हरिनामाचा गजर ,अभंग ,भजन ,गोंधळातील गण ,शाहिरी गण, डफया ,गोंधळ ,गवळण ,जुगलबंदी ,आणि भैरवी या विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली.
हे देखील वाचा-
- Maghi Ganesh Jayanti 2022 : माघी गणेश जयंतीनिमित्त जाणून घ्या तिथी, मुहूर्ताची वेळ, पूजा आणि उपवासाचे महत्त्व
- Maghi Ganesh Jayanti : माघीचा गणेश जयंतीचा उत्साह; मंदिरं सजली, भाविकांची गर्दी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha