Kitchen Tips : नियमितपणे स्वयंपाक (Kitchen) करणाऱ्या व्यक्तीलाच स्वयंपाकघरातील भांडी (Utensils) सांभाळून ठेवणं आणि स्वच्छ ठेवणं किती कठीण असते याची जाणीव असते. अस्वच्छ भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यावर निश्चितच दुष्परिमाण होतात. त्यामुळे हे आजार टाळण्यासाठी भांडी स्वच्छ ठेवणं अतिशय गरजेचं आहे. सध्या स्वयंपाकघरातील भांड्यांबद्दल बोलायचं झालं तर अनेकांच्या घरात स्टील, अॅल्युमिनियम, तांबे, पितळ, माती तसंच लाकडाची भांडे असतात. लाकडी चमचे, चॉपिंग बोर्ड आणि पिठाच्या वाट्या यासारखी लाकडी भांडी (Wooden Utensils) स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या वस्तू आहेत. त्यांचा वारंवार वापर होतो. परिणामी त्याच्यावर सहजपणे घाण साचू शकते. तसंच ही भांडी तेल शोषून घेतात त्यामुळे ते स्वच्छ करणं हे मोठं कठीण काम असतं. डाग किंवा दुर्गंधीयुक्त भांडी वापरणं कोणाला आवडेल. जर तुमचीही अशीच परिस्थिती असेल तर तुमच्यासाठी लाकडी भांडी स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स देत आहे, त्याने तुमचा भार निश्चितच हलका होईल.


मीठाने घासा
पहिल्यांदा लाकडी भांड्यांवरील जीवाणू काढण्यासाठी साबणाच्या गरम पाण्यात ती स्वच्छ धुवून घ्या. यानंतर भांड्यांवर मीठ (Salt) टाका आणि मीठ विरघळेपर्यंत त्यावर अर्ध लिंबू  चोळा, आता त्यावर चांगले भरड मीठ टाका आणि मीठ विरघळेपर्यंत अर्धा लिंबू चोळा. त्यानंतर भांडे थंड पाण्याने धुवा आणि कोरडे होऊ द्या.


लिंबाच्या रस वापरा 
भांड्यांची दुर्गंधी आणि डाग काढण्यासाठी वापरला जाणारा किचनमधील सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे लिंबू (Lemon). लाकडी भांड्यांवरील डाग घालवण्यासाठी  तुम्हाला फक्त ते भांडे गरम पाण्यात बुडवून त्यात लिंबाचा रस पिळायचा आहे. लिंबाचा रस थेट भांड्यांवर सुद्धा लावू शकता आणि 5 ते 10 मिनिटांनी धुवा.


बेकिंग सोडा वापरा
जर लिंबाने डाग गेले नसतील तर बेकिंग सोड्याची (Baking Soda) मदत होऊ शकते. डाग असलेल्या जागेवर बेकिंग सोडा टाका आणि त्यावर लिंबाचा रस पिळा. हा भाग साफ करण्यासाठी एका स्वच्छ कापडाचा वापर करा. त्यानंतर भांडे धुवा आणि सुकण्यासाठी ऊन्हात ठेवा.


व्हिनेगरमध्ये भांडी भिजवून ठेवा
भांड्यांवरील डाग घालवण्यासाठी आणखी एक चांगला उपाय म्हणजे आपली लाकडी भांडी पाणी आणि व्हाईट व्हिनेगर (Vinegar) यांच्या समान प्रमाणातील द्रावणात रात्रभर भिजवून ठेवणे. यामुळे भांड्यांवरील दुर्गंधी दूर होऊन ती स्वच्छ होतील.


सॅण्डपेपरने स्वच्छ करा
जर हे सर्व उपाय कामी आले नाही तर डाग काढून टाकण्यासाठी सॅण्डपेपर (Sandpaper) वापरुन पहा. सॅण्डपेपरने भांडे घासल्यामुळे वरचा थर निघून जातो. राहिलेले डाग काढून टाकण्यास सॅण्डपेपरची मदत होते. याशिवाय तुमच्या लाकडी भांड्यांना उत्तम प्रकारे गुळगुळीत फिनिश देतो.


तर, पुढच्या वेळी तुम्ही तुमची लाकडी भांडी स्वच्छ करत असाल तेव्हा या टिप्स नक्की लक्षात ठेवा!