Kidney Transplant Surgery: निकामी झालेले मूत्रपिंड काढून त्याच्या जागी निरोगी मूत्रपिंड बसवण्याच्या शस्त्रक्रियेला मूत्रपिंड प्रत्यारोपण म्हणतात. हे मूत्रपिंड जिवंत दात्याकडून किंवा मेंदूमृत दात्याकडून मिळू शकते. मूत्रपिंड हे महत्त्वाचे अवयव आहे. जे शरीरातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव फिल्टर करतात. जेव्हा हे मूत्रपिंड काम करणे थांबते, तेव्हा त्या व्यक्तीला दिर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार (CKD) किंवा मूत्रपिंड निकामी होण्याचा त्रास होऊ शकतो. किडनी प्रत्यारोपणामुळे दीर्घकाळाचा आणि प्रभावी उपाय मिळतो. यामुळे रुग्णाचे आयुष्य अधिक चांगले होते आणि जगण्याचे प्रमाणही सुधारते. अशा परिस्थितीत, मूत्रपिंड प्रत्यारोपण हा सर्वोत्तम उपचार पर्यायांपैकी एक ठरतो.
जेव्हा दोन्ही मूत्रपिंड निकामी होतात, तेव्हा केवळ डायलिसिसवर रुग्णाचे आरोग्य सुरळीत राहु शकत नाही, तेव्हा किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला जातो. मूत्रपिंड खराब होण्याची प्रमुख कारणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, दीर्घकालीन संसर्ग आणि आनुवंशिक आजारांचा समावेश आहे. प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंड हे जिवंत दात्याकडून (बहुतेक वेळा कुटुंबातील व्यक्ती) किंवा मेंदूमृत दात्याकडून मिळू शकते.
शस्त्रक्रियेपूर्वी दाता आणि प्राप्तकर्ता दोघांच्याही वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. त्यानंतरच डॉक्टर प्रत्यारोपण होऊ शकते की नाही हे ठरवतात. मूत्रपिंड प्रत्यारोपण हे मूत्रपिंडाचे कार्य पुनर्संचयित करण्यास मदत करते, ज्यामुळे ऊर्जेची पातळी आणि जीवनाची एकूण गुणवत्ता सुधारते. यामुळे दीर्घकालीन डायलिसिसची गरज देखील नाहीशी होते, ज्यामुळे रुग्णांना अधिक सक्रिय आणि निरोगी जीवन जगता येते.
प्रत्यारोपण प्रक्रिया आणि पुनर्प्राप्ती : या शस्त्रक्रियेद्वारे निरोगी दात्याचे मूत्रपिंड प्राप्तकर्त्याच्या पोटाच्या खालच्या भागात प्रत्यारोपित केले जाते. शिवाय, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला एक ते दोन आठवडे रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. नव्याने प्रत्यारोपित अवयव नाकारला जाऊ नये म्हणून, रुग्णाला आयुष्यभर इम्युनोसप्रेसंट्स (रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे) घ्यावी लागतात.
प्रत्यारोपणानंतर रुग्णाने नियमित तपासणी करणे, निरोगी आहाराचे सेवन करणे, संसर्गापासून दूर राहणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेणे आवश्यक आहे. रुग्णांना धूम्रपान, मद्यपान आणि स्वमर्जीने औषधोपचार टाळण्याचा आणि निरोगी जीवनशैली अवलंबण्याचा सल्ला दिला जातो. मूत्रपिंड प्रत्यारोपण हे रुग्णांसाठी त्यांच्या भावी आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवणारे ठरते. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि माहितीच्या आधारावर निर्णय घेणे गरजेचे आहे.
डॉ. सचिन गुप्ता, नेफ्रोलॉजिस्ट आणि प्रत्यारोपण चिकित्सक, एम्स हॉस्पिटल, डोंबिवली
महत्त्वाच्या इतर बातम्या:
इंटिमसी अन् कंडोम; भरकार्यक्रमात Gen Zसमोर हनी सिंह काय म्हणाला? VIDEO व्हायरल होताच मागितली माफी