मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी गावातील रंजिश मंजेरी या 34 वर्षीय तरुणाने मॅट्रिमोनी जाहिरात फेसबुकवर पोस्ट केली. यानंतर रंजिशवर अक्षरश: स्थळांचा वर्षावच झाला. रंजिश हा व्यवसायाने फोटोग्राफर आहे.
"माझं लग्न अजून ठरलेलं नाही. जर तुमच्या माहितीत कोणी असेल तर मला नक्की कळवा. मी 34 वर्षांचा आहे. मला तिला भेटण्याची इच्छा आहे आणि मला ती आवडायला हवी. माझ्या इतर कोणत्याही अटी नाहीत. काम : प्रोफेशनल फोटोग्राफ. हिंदू. जातीची अट नाही. वडील, आई आणि विवाहित बहिण असं माझं कुटुंब आहे," अशी पोस्ट रंजिशने फेसबुकवर लिहिली आहे.
मॅट्रिमोनियन वेबसाईट आणि नातेवाईंकाच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतरही वधू न मिळाल्याने एका मित्राच्या सल्ल्याने रंजिशने 28 जुलै रोजी फेसबुकवर जाहिरात पोस्ट केली.
दिवसभरातच त्याची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली. तब्बल 4000 जणांनी त्याची पोस्ट शेअर केली. त्याच्या पोस्टवर 1000 कमेंट्स, 16,000 रिअॅक्शन आल्या. काहींनी त्याला शुभेच्छा दिल्या, तर काही त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
"रंजिशच्या पोस्टनंतर अमेरिकेतील एका वैज्ञानिक तरुणीने त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण जर त्यांचं जुळलं नाही तर मी फोटोग्राफरसोबत त्याचं लग्न जुळवून देईन," असं एका युझरने लिहिलं आहे.
"ही अगदी चांगली कल्पना आहे. यामध्ये मला काहीही वावगं वाटत नाही. देव तुझ्यावर कृपा करो," असं आणखी एका युझरने लिहिलं आहे.
"रंजिशने या पोस्टमध्ये त्याचा मोबाईल नंबर लिहिला आहे. पोस्टनंतर मला जगभरातून अनेक इच्छुकांचे कॉल आणि मेसेज येत आहेत. काही खोडकर कॉल वगळता भारत, ऑस्ट्रेलिया, बहारीन, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून अनेक कुटुंबांनी प्रामाणिकपणे चौकशी केली," असंही रंजिश मंजेरीने सांगितलं.
"माझ्याच वयाच्या असेलेल्या मुलींकडून चौकशी होत आहे, तर काही घटस्फोटित. शेकडो प्रस्तावांमधून एकीची निवड करणं अतिशय कठीण आहे. फोटो आणि इतर माहिती पाठवण्यासाठी अनेकांना मी माझा व्हॉट्सअॅप नंबर दिल्याचं रंजिशने सांगितलं.
परदेशी मुलीसोबत लग्न करायला तयार आहेस का? असं विचारलं असता रंजिश म्हणाला की, "परदेशी मुलीशी लग्न करण्यास मला काहीच हरकत नाही. त्याच्या फायदा-तोट्याचा मला विचार करावा लागेल. मी आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. बहिणीचं लग्न झालं असून तिला 18 वर्षांची मुलगी आहे. त्यामुळे फार जबाबदारी नाही."
माझं हे पाऊल इतर तरुणांना सोशल मीडियाच्या ताकदीची जाणीव करण्यास प्रोत्साहन देईल, असं रंजिश मंजेरी म्हणाला.