मुंबई : जागतिक महिला दिवस कधी असतो याचं उत्तर आपल्यापैकी अनेकांना माहित असेल. पण जागतिक पुरुष दिन कधी असतो या प्रश्नाचं उत्तर देताना विचार करावा लागेल किंवा माहितही नसेल. जागतिक पुरुष दिन 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. म्हणजेत आज जगभरात जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात येत आहे. समाजात फक्त महिलाच नाही, ज्यांच्यावर अत्याचार होतो. आपल्या आजूबाजूला पाहिलं तर अनेक पीडित पुरुषही दिसतील. शोषण, पक्षपात, हिंसा, असमानता याची झळ पुरुषांनाही बसते. पुरुषांचं मानसिक आरोग्य, पुरुषत्वाच्या सकारात्मक गुणांचं कौतुक, समाजातील आदर्श पुरुषांना मुख्य प्रवाहात आणणं आणि लैंगिक समानता हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
जगभरातील 60 पेक्षा जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. 1999 मध्ये पहिला पुरुष दिन साजा करण्यात आला. भारतात त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजेच 19 नोव्हेंबर 2007 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला होता. 'पुरुष आणि मुलांचे उत्तम आरोग्य' ही यंदाच्या पुरुष दिनाची थीम आहे.
पुरुष दिनाचा इतिहास
1923 मध्ये काही पुरुषांनी आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या धर्तीवर 23 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याची मागणी केली होती. यानंतर 1968 मध्ये अमेरिकेतील पत्रकार जॉन पी. हॅरिस यांनी एका लेखात म्हटलं होतं की, सोव्हिएत प्रणालीत संतुलनाची कमतरता आहे. ही प्रणाली महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरी करते, पण पुरुषांसाठी कोणत्याही प्रकारचा दिवस साजरा केला जात नाही. यानंतर 19 नोव्हेंबर 1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या नागरिकांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला. डॉ. जीरोम तिलकसिंह यांनी पुरुषांचं योगदान मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. तेव्हापासून 19 नोव्हेंबरला संपूर्ण जगात त्यांच्या वडिलांच्या जन्मदिवसाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो.
अशाप्रकारे साजरा करा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस
परदेशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस विविध पद्धतीने साजरा केला जातो. भारतात आता कुठे या दिवसाला प्रसिद्धी मिळाली आहे. जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरातून करा. घरातील पुरुष सदस्यांना ते खास असल्याची जाणीव करुन द्या. त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवा, गिफ्ट द्या किंवा छान मेसेज असलेलं कार्ड देऊनही तुम्ही हा दिवस साजरा करु शकता.