Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिन म्हटला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत संपूर्ण देश देशभक्तीच्या रंगात रंगून जातो. यंदाचा स्वातंत्र्यदिनही खास असणार आहे. 15 ऑगस्ट 2024 या दिवशी संपूर्ण देश स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. यानिमित्ताने देशवासीय आपापल्या घरांमध्ये, कार्यालयांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालये आणि सरकारी इमारतींमध्ये हा सण साजरा करतात. यानिमित्ताने अनेक ठिकाणी देशभक्तीपर गीते, भाषणं ऐकायला मिळतात. स्वातंत्र्य दिनाचा सण दरवर्षी वेगळ्या थीमवर साजरा केला जातो. यावेळी देशात हा सण कोणत्या थीमवर साजरा करण्यात येणार आहे ते जाणून घेऊया.


 


स्वातंत्र्य दिन-2024 कोणत्या थीमवर साजरा केला जाईल?


गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाची थीम होती 'राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम', तर यंदा 'विकसित भारत' या थीमवर स्वातंत्र्यदिनाचा सण साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होत असताना भारताला विकसित देश बनवणे हे देशाचे ध्येय आहे.


 


स्वातंत्र्य दिन-2024 दिवशी काय असेल खास?


दरवर्षी प्रमाणे, यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पोहोचतील, जिथून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला सुरुवात होईल. या ऐतिहासिक स्थळावर पंतप्रधान दरवर्षी देशाला संबोधित करतात. पंतप्रधानांच्या आगमनावेळी सशस्त्र दल आणि पोलीस दलाच्या जवानांकडून औपचारिक गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. यानंतर पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला जातो. देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि एकतेचे प्रतीक असलेला हा महत्त्वाचा क्षण आहे. ध्वजारोहण समारंभानंतर "जन गण मन" हे राष्ट्रगीत वाजवले जाते. यासोबत 21 तोफांची सलामी दिली जाते, जो एक पारंपारिक लष्करी सन्मान आहे. तर राष्ट्रगीत आणि सलाम हे राष्ट्राभिमान आणि देशाचा आदर दर्शवितात.


 


पंतप्रधानांचे भाषण असेल विशेष 


कार्यक्रमानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करतात. यानंतर भारताची सांस्कृतिक विविधता, लष्करी सामर्थ्य आणि तांत्रिक प्रगती दर्शविणारी भव्य परेड होते. भारतीय सशस्त्र दल, भारतीय पोलीस आणि राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सच्या विविध रेजिमेंट राष्ट्रीय अभिमान आणि एकता प्रदर्शित करण्यासाठी यात सहभागी होतात. या परेडमध्ये भारताचा समृद्ध वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञान लष्करी प्रदर्शन आणि इतर घटकांचा समावेश आहे.


 


 


हेही वाचा>>>


Travel : 15 ऑगस्टचं निमित्त...अन् भारतीय रेल्वेतर्फे कमी बजेटमध्ये फिरण्याची संधी! स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाचा इतिहास, संस्कृती जाणून घ्या


 


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )