मुंबई : हिंदू धर्माचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा. त्यामुळे हिंदू धर्मात गुडीपाडव्याला (Gudi Padwa 2024) विशेष महत्त्व आहे. या दिवशी घर-कार्यालयाची साफसफाई, फुलांची सजावट करत देवाला गोडाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी गुढीपाडवानिमित्त वर्षाच्या पहिल्या दिवशी हापूस (Alpanso Mango) खरेदी करण्याचीही परंपरा आहे. गुडी पाडव्याच्या दिवशी हापूस आंब्याची पहिली पेटी खरेदी करण्याची काही ठिकाणी पद्धत आहे. अस्सल हापूस म्हणजे कोकणी हापूस आंबे. कोकणातील हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांच्या चवीची बातच न्यारी आहे. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस म्हणजे अस्सल हापूस आंबा.
हापूस आंब्यांच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक
कोकणातील अस्सल हापूसाला देशविदेशात मोठी मागणी असते. बाजारात अस्सल कोकणी हापूससोबतच इतर आंबेही दाखल होत असतात. दक्षिण भारतातील आंबेही बाजारात मोठ्या संख्येने दाखल होतात. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यातून आंबे बाजारात उपलब्ध असतात. हापूस आंबा अतिशय प्रसिद्ध असल्याने त्याची किंमत जास्त असते.
अस्सल हापूस आणि इतर आंबे यातील फरक कसा ओळखावा?
हापूस आंब्याची किंमत कर्नाटकी किंवा इतर आंब्यांच्या तुलनेने 50 टक्के जास्त असते. यामुळे व्यापारी स्वत:चा फायदा करण्यासाठी ग्राहकांना अस्सल हापूस आंबा सांगून नकली किंवा दुसरे आंबे जास्त किमतीला विकतात आणि यामध्ये ग्राहकांची फसवणूक होते. अस्सल हापूस आणि कर्नाटकी हापूस यामधील फरक प्रथम दर्शनी दिसून येत नाही. ही फसवणूक टाळण्यासाठी काय करावं? सर्वसामान्यांना अस्सल हापूस आणि इतर आंबे यातील फरक कसा ओळखावा, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर याचं उत्तर जाणून घ्या.
अस्सल हापूस आंबा कसा ओळखावा? How to Identify Original Alphonso Mango
- अस्सल हापूस आंबा वरच्या बाजूला फुगीर असतो, इतर आंबे तुलनेने निमुळते असतात.
- अस्सल हापूस आंब्याच्या सुगंध वेगळा असतो.
- अस्सल हापूस आंब्याचा देठ खोल असतो.
- अस्सल हापूस आंब्याची साल पातळ असते.
- अस्सल हापूस आंबा बॉटल ग्रीन रंगाचा असतो, इतर आंबे बेलग्रीन रंगाचे असतात.
- हापूस आंबा आतून केशरी रंगाचा असतो, तर कर्नाटकी किंवा इतर आंबे हे आतून पिवळ्या रंगाचे असतात.