मुंबई : होळी म्हणजे रंगांचा सण. या सणाची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. पण सध्याच्या जगात धुळवड, रंगपंचमीला रासायनिक रंगांपासून त्वचा आणि केसांची काळजी घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्वचा आणि केसांना कोणताही त्रास न होता जल्लोषात होळी साजरी करण्यासाठी काही खास टिप्स.. त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स- रंग खेळायला जाण्याआधी त्वचेला आणि केसांना खोबरेल तेल लावून मालिश करावं महिलांनी नखांना भडक रंगाची नेल पॉलिश लावावी रंगाचा आपल्या त्वचेशी जास्त संपर्क येऊ नये यासाठी जास्तीत जास्त शरीर झाकलं जाईल, असे कपडे वापरावेत. रंग खेळायला जाण्याआधी कुठे कापलं किंवा भाजलं असेल तर तिथे बॅण्डेज लावणं आवश्यक आहे. कारण त्या जखमेतून कृत्रिम रंग शरीरात गेल्याने अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. कृत्रिम रंग डोळ्यांमध्ये गेल्यास डोळ्यांचे आजार किंवा दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. शक्य झाल्यास डोळ्यांवर चष्मा किंवा गॉगल लावावा. डोळ्यात रंग गेल्यास थंड पाण्याने डोळे धुवावेत. तुमची त्वचा जर कोरडी असेल तर केसांना आणि त्वचेला तेल लावणं आवश्यक आहे.त्वचेला खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल लावू शकता. रंग खेळून झाल्यानंतर रंग काढण्यासाठी लिक्विड सोपचा वापर करावा. त्वचा जास्त घासणं किंवा स्क्रब करणं टाळावं. गरम पाण्यापेक्षा थंड पाण्याने आंघोळ करावी. रंग काढण्यासाठी थंड दुधामधे तिळाचं तेल घालून ते संपूर्ण त्वचेवर लावावं.यामुळे त्वचेवरचा रंग तर निघून जाईलच त्याचसोबत सूर्यकिरणांचा तुमच्या शरीरावर जर काही परिणाम झाला असेल तर तोसुद्धा कमी होईल. धुळवड खेळून घरी परतल्यावर भरपूर पाणी प्यावं. कारण शरीरात चुकून गेलेल्या रासायनिक पदार्थांची बाधा होणार नाही. केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स- - मुलींनी केस बांधूनच धुळवड खेळावी. तसंच मुलं आणि मुलींनी धुळवड खेळण्यापूर्वी केसांना खोबरेल तेल लावावं. - रंग खेळून आल्यानंतर केस कंडिशनरने धुवावेत - धुळवड खेळून आल्यानंतर केस सौम्य शॅम्पू, लेमन ज्यूसनेच धुवावेत. एकाच आंघोळीत रंग काढून टाकण्यासाठी शॅम्पूचा अतिरिक्त वापर करु नये.