Hepatitis : येत्या 28 जुलै रोजी जागतिक हेपटायटस दिवस (World Hepatitis Day)आहे. हेपटायटसबद्दलची (Hepatitis) माहिती ही त्याच्या प्रतिबंधाची प्रभावी पद्धत ठरु शकते. हेपटायटसबद्दल जागरुकतेचा अभाव ही मोठी समस्या आहे. लक्षणे दिसू लागतात तेव्हाच बहुतेक लोक डॉक्टरकडे जातात. त्यावेळी विषाणूने यकृतावर आधीच परिणाम केलेला असतो. अशा परिस्थितीत लक्षणांची माहिती आणि त्याविषयी जागरुकता जीव वाचवू शकते. मुंबईतील मीरा रोड इथल्या वोक्हार्ट हॉस्पिटल्समधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. मृदुल धरोड सांगतात की या संसर्गाचा सामना करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तो ओळखणे. त्याची लक्षणे (Symtoms) समजून घेऊन योग्य वेळी तपासणी करुन घेतल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो
जाणून घ्या हेपटायटसबद्दल
हेपटायटस हा यकृताचा एक दाह असून तो हेपटायटस विषाणूमुळे होतो. त्यामुळे शरीरातील ऊतींना दुखापत किंवा संसर्ग झाल्यास सूज येते. यामुळे शरीरातील इतर अवयवांचेही नुकसान होते. विविध अभ्यासांनुसार, हेपटायटस ए, बी,सी,डी आणि ई यासह अनेक प्रकारचे विषाणू हेपटायटसला कारणीभूत आहेत. शिवाय, एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेद्वारे, दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे हेपटायटस ए आणि हेपटायटस ई संसर्ग होऊ शकतो.
कमी शिजवलेले डुकराचे मांस, हरण किंवा शेलफिश खाल्ल्यानेही हेपटायटस ई होऊ शकतो. एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या रक्ताच्या संपर्कात आल्यावर देखील हेपटायटस बी, सी आणि डी पसरतो. हेपटायटस बी आणि डी इतर शरीरातील द्रवपदार्थांच्या संपर्कात येण्याद्वारे देखील पसरु शकतात किंवा असुरक्षित लैंगिक संबंधाद्वारेही संक्रमण होऊ शकते. हेपटायटस बी, सी आणि डी विषाणू तीव्र आणि जुनाट, किंवा दीर्घकाळ टिकणाऱ्या संसर्गांना आमंत्रित करु शकतात.
हेपटायटसची लक्षणे
हेपटायटस असलेल्या अनेक लोकांमध्ये गडद लघवी, असह्य पोटदुखी, कावीळ, ताप, भूक न लागणे, अशक्तपणा वाटणे आणि सांधेदुखी यांसारखी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांची नोंद घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य उपचार करणे आवश्यक आहे.
हेपटायटस होण्याचा धोका कोणाला?
जे ड्रग्स घेण्यासाठी सारख्याच सुया वाटून घेतात, असुरक्षित संभोग करतात, ज्यांचे एकापेक्षा अधिक लैंगिक साथीदार असतात, मद्यपान करणे, अपुरे पोषण, हॉस्पिटल किंवा नर्सिंग होममध्ये काम करणारे लोक, आणि दीर्घकाळ किडनी डायलिसिसवर राहिल्याने ही स्थिती उद्भवू शकते.
उपचार
उपचार करणारा डॉक्टर शारीरिक तपासणी करेल आणि हेपटायटसच्या संभाव्य संपर्काबद्दल जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारेल. हेपटायटस ए आणि ई साठी अद्याप कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. एखाद्याला बरे होण्यासाठी काही आठवडेही लागू शकतात. स्वतःच्या मनाने औषध घेणे टाळावे. परंतु, तुम्हाला हेपटायटीस बी, सी आणि डी असल्यास डॉक्टर औषधे देतील. त्यामुळे कोणतीही औषधे वगळू नका.
व्हायरल हेपटायटस टाळण्यासाठी टिप्स
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हेपटायटस ए आणि हेपटायटस बी साठी लसीकरण करा. संभोग करताना संरक्षण वापरण्याचा प्रयत्न करा, वापरलेल्या सुया पुन्हा वापरु नका, चांगली वैयक्तिक स्वच्छता राखा, तुमचे हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा आणि कोणतेही टॅटू किंवा शरीरावर गोंदताना सावधगिरी बाळगा. तसेच, अस्वच्छ भागात प्रवास करताना सतर्क राहा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवा. अत्यंत काळजी घेतल्यास हेपटायटसपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. या सर्व सूचनांचे पालन करा आणि सुरक्षित रहा. स्वतःची काळजी घेण्याचे आणि निरोगी जीवन जगण्याचे प्रयत्न करा. दरवर्षी नियमित तपासणीसाठी करत असल्याची खात्री करा.