World Diabetes Day 2025: आज जागतिक मधुमेह (Diabetes) दिन... सध्या भारतात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून लाखो लोक या आजाराने पिडीत आहेत. त्याहूनही चिंताजनक बाब म्हणजे त्यापैकी जवळपास 50 टक्के रुग्णांना त्यांच्या मधुमेहाबद्दल माहितीच नाही. मुंबईतील झायनोवा शाल्बी हॉस्पिटलच्या एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. राशी अग्रवाल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जाणून घेऊया...

Continues below advertisement

मधुमेह होतो तेव्हा... तज्ज्ञ सांगतात...(World Diabetes Day 2025)

डॉक्टर राशी म्हणतात, मधुमेह हा एक जुनाट असा चयापचय विकार आहे, मधुमेह तेव्हा होतो, जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही. यामुळे रक्तातील साखरेची (ग्लुकोजची) पातळी वाढते. स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नसल्यास टाईप 1 मधुमेह किंवा शरीर इन्सुलिनला प्रतिरोधक बनल्यास टाईप 2 मधुमेह होतो. यावर नियंत्रण न ठेवल्यास मधुमेहामुळे हृदयविकार, मज्जातंतूंचे नुकसान, मूत्रपिंड निकामी होणे, अंधत्व आणि अवयव कापावा लागणे यांसारख्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

बऱ्याचदा मधुमेहाची सुरुवातीला लक्षणं जाणवत नाहीत..

डॉ. राशी अग्रवाल सांगतात की, बऱ्याचदा मधुमेहाची सुरुवातीला लक्षणं जाणवत नाहीत, म्हणूनच 50 टक्के लोकांना आपल्याला मधुमेह आहे हे माहित नसते. 30 ते 65 वयोगटातील अनेक रुग्ण आमच्याकडे हृदय किंवा मूत्रपिंडाच्या समस्येनंतर उपचाराकरिता येतात आणि त्यांना त्यावेळी मधुमेहाचे निदान होते. अशात जागरूकतेचा अभाव, अनियमित तपासणी आणि ‘मधुमेह फक्त वयवृद्धांचा आजार आहे’ या गैरसमजूतीमुळे याच्या निदानात विलंब होतो. डॉक्टर सांगतात, हृदयरोग, मूत्रपिंडाचे नुकसान किंवा दृष्टीदोष यांसारख्या गंभीर गुंतागुंती झाल्यानंतरच या व्यक्तींना मधुमेहाचे निदान होते. तज्ज्ञांच्या मते, वेळेवर तपासणी, नियमित निदान आणि संतुलित जीवनशैली या गोष्टी दीर्घकालीन गुंतागुंत टाळण्यासाठी तसेच जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. 

Continues below advertisement

'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका...

डॉ. राशी  पुढे सांगतात की, तहान वाढणे, वारंवार लघवी होणे, वजन कमी होणे, थकवा, दृष्टी कमजोर होणे आणि जखमा बरे होण्यास वेळ लागणे ही लक्षणे कायम राहिल्यास रक्तातील साखरेची तात्काळ तपासणी करावी. साध्या रक्तातील साखरेच्या चाचण्यांमुळे आजार वेळीच ओळखता येतो आणि गंभीर गुंतागुंत टाळता येते.”

30 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी..

मुंबईतील अपोलो डायग्नोस्टिक्स येथील रिजनल टेक्नीकल हेड डॉ. उपासना गर्ग सांगतात की, मधुमेहाच्या निदानाकरिता नियमित तपासणी हा सर्वात प्रभावी उपाय आहे. फास्टिंग ब्लड शुगर (FBS), पोस्टप्रांडियल ब्लड शुगर (PPBS) आणि HbA1c चाचण्या मधुमेह नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विशेषतः 30 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी किंवा कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असलेल्यांनी नियमित तपासणी करावी. निरोगी आहार, दररोज व्यायाम, तणावाचे नियंत्रण, धूम्रपान टाळणे आणि पुरेशी झोप हीच मधुमेह नियंत्रणाची गुरुकिल्ली आहे. नियमित तपासणी आणि जीवनशैलीत बदल केल्यास गंभीर आजारांपासून दूर राहता येणे शक्य आहे.

हेही वाचा

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी नोव्हेंबरचा तिसरा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, करिअर? कोण होणार मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)