Winter Care: हिवाळा सुरू झाला आहे. राज्यात थंडीचं प्रमाण वाढत चाललंय. वाढत्या थंडीसोबत इतर अनेक आजार डोकं वर काढतात. बऱ्याचदा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बरेचजण पाय गुडघ्यांमध्ये दुमडून झोपतात, यामुळे पाठीच्या कण्याच्या नैसर्गिक रचनेवर ताण येतो. त्याचबरोबर एकाच जागी बसून तासनतास काम करणे, मोबाईल-लॅपटॉपचा अतिवापर आणि व्यायामाचा अभाव यामुळे चुकीची शारीरिक स्थिती (पोश्चर) ही मोठी समस्या बनली आहे. यामुळे पाठीचे दुखणे, मानेचे दुखणे आणि कंबरेचे दुखणे यांसारख्या तक्रारी वाढतात. याबाबत वरिष्ठ ऑर्थोपेडिक आणि स्पाइन सर्जन डॉ. धीरज सोनवणे यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.
हिवाळ्यात पाठदुखीची समस्या सर्वच वयोगटात...
डॉक्टर सांगतात, थंड हवामानात शरीरातील स्नायू आकुंचन पावतात आणि रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे स्नायूंमध्ये कडकपणा येतो आणि लवचिकता कमी होते. हिवाळ्यात अनेक जण व्यायाम करणं टाळतात, घराबाहेर पडणे टाळतात आणि दीर्घकाळ बसून राहतात. या सवयींमुळे पाठीचे दुखणे, मान आणि खांद्यांमध्ये वेदना होतात. सांधेदुखी आणि श्वसनाच्या समस्यांव्यतिरिक्त, हिवाळ्यात पाठदुखी हा आणखी एक सामान्यपणे आढळून येणारी समस्या आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिवाळ्यात पाठदुखीची समस्या सर्वच वयोगटात आढळून येते. थंड तापमानामुळे स्नायूंना कडकपणा येतो आणि हालचाल मंदावल्याने अस्वस्थता वाढते. पुरेशी जागरूकता आणि जीवनशैलीतील बदलांसह हिवाळ्याशी संबंधित पाठदुखी टाळता येते आणि ती प्रभावीपणे व्यवस्थापित केली जाऊ शकते.
हिवाळ्यात स्नायुंवर ताण येण्याची शक्यता अधिक
डॉक्टर सांगतात, तापमान कमी झाल्यामुळे पाठीच्या कण्याला आधार देणारे स्नायू घट्ट होतात, ज्यामुळे लवचिकता कमी होते आणि स्नायुंवर ताण येण्याची शक्यता अधिक असते. शरीर उबदार राहण्यासाठी अंथरुणात पाय दुमडून बसल्याने स्नायुंवर अतिरिक्त ताण येतो. बरेच लोक थंडीमुळे शारीरीक हालचाली टाळतात ज्यामुळे स्नायुंना कडकपणा येतो. जेव्हा हे स्नायू ताणले जातात, तेव्हा वाकणे, जड वस्तू उचलणे किंवा जास्त वेळ एका जागी बसणे यासारख्या साध्या कृती देखील वेदनांना कारणीभूत ठरतात. स्नायुंचा कडकपणा, वेदना जाणवणे, लवचिकता कमी होणे आणि थकवा जाणवणे अशी लक्षणं दिसतात. दुर्लक्ष केल्यास, स्पॉन्डिलायसिस, मणक्याच्या डिस्क संबंधीत समस्या आणि स्नायूंमध्ये जळजळ यासारख्या परिस्थिती आणखी बिकट होऊ शकतात. हिवाळ्यात वेदना का वाढतात हे समजून घेतल्यास व्यक्तींना वेळीच प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास मदत होते अशी प्रतिक्रिया डॉ. धीरज सोनवणे यांनी व्यक्त केली.
काय काळजी घ्याल...
डॉक्टर सांगतात, हिवाळ्यात पाठदुखी अगदी त्रासदायक ठरु शकते, स्नायूंमधील कडकपणा वारंवार ताण येतो किंवा थंडीमुळे आधीच अस्तित्वात असलेले संधिवात आणि स्पॉन्डिलायसिस बिघडले तर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी संपूर्ण अंग झाकणारे ऊबदार कपडे कपडे घाला आणि स्वतःला उबदार ठेवा, एकाच स्थितीत जास्त वेळ बसणे टाळा आणि सौम्य शारीरीक हलचाल करा. झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करा ज्याने स्नायूंना पुरेसा आराम मिळतो. रूम हीटर वापरल्याने सकाळी आणि रात्रीच्या वेळी स्नायुंचा कडकपणा टाळता येतो. पुरेसे हायड्रेशन आणि संतुलित आहार देखील स्नायूंचा थकवा आणि सूज कमी करतो. हिवाळ्यातील पाठदुखी कमी करणाऱ्या टिप्समुळे नक्कीच मदत होऊ शकते. वारंवार बसण्याची स्थिती बदलणे गरजेचे आहे, एकाच स्थितीत जास्त वेळ बसल्याने स्नायुंवरील ताण वाढतो. दिवसाची सुरुवात हलक्या स्ट्रेचिंगने करा गरम पाण्याने आंघोळ करा आणि पाठीला पुरेसा आराम मिळेल अशी आसन व्यवस्था असेल याची खात्री करा. शरीर हायड्रेटेड राखा आणि पोषक आहार घ्या. स्नायुंमधील वेदना हळूहळू कमी होतात आणि हालचाल सुधारते. योग्य काळजी घेतल्यास हिवाळ्यातील पाठदुखी टाळता येते.
हेही वाचा
Shukraditya Rajyog 2025: सज्ज व्हा..2025 जाता जाता 3 राशींचा संपत्तीचा मार्ग करणार मोकळा! पॉवरफुल शुक्रादित्य राजयोगानं पैसा, नोकरी, प्रेमात मोठं यश
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)