एक शतकापेक्षा जास्त काळापासून भारतीय लोकवस्तीच्या डोक्यावर ट्यूबरक्युलॉसिस (टीबी) म्हणजे क्षयरोगाचे चे ओझे आहे.  19501 च्या दशकात राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संकट म्हणून ओळखण्यात आलेला हा रोग आजही एक मुख्य आरोग्य चिंतेचा विषय आहे. WHO ग्लोबल ट्यूबरक्युलॉसिस रिपोर्ट 20242 अनुसार, जगातील 26% पेक्षा जास्त क्षयरोगाचे रुग्ण भारतात आहेत. भारतात संसर्गजन्य रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असूनही क्षयरोग मृत्यूचे प्रमुख कारण आहे. या व्यतिरिक्त, बहुऔषध प्रतिरोधक क्षयरोग (MDR-TB) आणि व्यापकपणे औषध-प्रतिरोधक (XDR-TB) हे देशातील वाढते धोके आहेत.

भारत या रोगाच्या ओझ्याशी झुंजत असताना देशातील दाट लोकवस्ती आणि आरोग्यसेवेतील असमानतेमुळे क्षयरोगाचा प्रसार सहजपणे होत आहे. शिवाय, प्रतिबंध आणि उपचारांच्या प्रयत्नांत चुकीची माहिती हा एक मोठा अडथळा आहे. भारतातील लोकांना क्षयरोग-मुक्त होण्यापासून अडवणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू या.

गैरसमज: क्षयरोग फक्त भारताच्या लोकवस्तीतील वंचित वर्गालाच प्रभावित करतो

वस्तुस्थिती: क्षयरोग कुणालाही होऊ शकतो. त्याचा वर्ग, उत्पन्न किंवा पार्श्वभूमीशी काहीही संबंध नाही. शहरी भागात राहणाऱ्या लोकांनाही क्षयरोग होऊ शकतो, विशेषतः जर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल किंवा संक्रमित व्यक्तीशी त्यांचा संपर्क आला तर.

गैरसमज: क्षयरोग अन्न किंवा स्पर्शातून पसरतो

वस्तुस्थिती: क्षयरोग एक संसर्गजन्य रोग आहे, जो मायकोबॅक्टीरियम ट्यूबरक्युलॉसिस नामक जिवाणूमुळे होतो. जेव्हा फुफ्फुसीय क्षयरोग असलेला माणूस खोकतो किंवा शिंकतो, तेव्हा हा जिवाणू हवेतून पसरतो. तो अन्न, पाणी किंवा स्पर्शातून पसरत नाही.

गैरसमज: क्षयरोगाचे निदान केवळ वेदनादायक किंवा इन्व्हेसिव्ह चाचण्यांमधूनच करता येते

वस्तुस्थिती: आज, SPIT SEQ चाचणीसारख्या नॉन- इन्व्हेसिव्ह चाचण्यांमार्फत क्षयरोगाचे निदान करता येऊ शकते. ही एक लाळेवर आधारित चाचणी आहे. थुंकीच्या स्पीअर्ससारख्या जुन्या पद्धतींच्या तुलनेत हा एक झटपट आणि त्रास-मुक्त निदानाचा पर्याय आहे. यामधून रोगाचे निदान तर होतेच, शिवाय, औषध प्रतिकार निर्माण करू शकणाऱ्या कोणत्याही आनुवंशिक उत्परिवर्तनाचा शोध देखील घेता येतो. यामुळे वेळेवर व्यक्ती-विशिष्ट उपचार घेता येणे शक्य होते.

गैरसमज: एकदा तुम्हाला क्षयरोग झाल्याचे निदान झाले की तुमचे जीवन सामान्य राहात नाही

वस्तुस्थिती: क्षयरोग हा योग्य उपचारांनी संपूर्णपणे बरा होऊ शकतो. औषधांचा सुचवलेला 6 महिन्याचा कोर्स पूर्ण केल्यानंतर बहुतांशी रुग्ण पूर्णपणे बरे होतात. लवकर निदान झाले आणि उपचार नियमित घेतले, तर क्षयरोगाचे रुग्ण सामान्य, आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतात.

गैरसमज: तुम्हाला बरे वाटले की तुम्ही क्षयरोगाचे उपचार थांबवू शकता

वस्तुस्थिती: सांगितले असेल त्या आधीच क्षयरोगाचे उपचार थांबवणे घातक ठरू शकते. त्यातून औषध प्रतिरोधक क्षयरोग (MDR-TB) होऊ शकतो, ज्याचा उपचार करणे आणखी कठीण आणि खर्चिक आहे. त्यामुळे उपचार सुरू केल्यानंतर काही आठवड्यांनी बरे वाटू लागले, तरी रुग्णांनी औषधांचा कोर्स पूर्ण करणे अनिवार्य आहे.

गैरसमज: पूर्वीच्या काळी करत त्याप्रमाणे क्षयरोगाच्या रुग्णांना वेगळे ठेवले पाहिजे

वस्तुस्थिती: क्षयरोगाच्या रुग्णांना संपूर्णपणे वेगळे ठेवण्याची गरज नसते. उपचार सुरू झाल्यानंतर 2-3 आठवड्यातच ते कमी संसर्गजन्य होतात. खोकल्याच्या बाबतीत स्वच्छतेची काळजी घेऊन आणि वैद्यकीय मार्गदर्शन घेऊन ते घरीच राहू शकतात तसेच कामावर किंवा शाळेत देखील जाऊ शकतात.

भारताची लोकवस्ती वाढते आहे, तशी आपली अधिक सक्षम आणि न्याय्य आरोग्य सेवा प्रणाली निर्माण करण्याची जबाबदारी देखील वाढत आहे. क्षयरोग हे पहिल्यापासून सार्वजनिक आरोग्यातील आव्हान आहे. त्याकडे तत्काळ लक्ष देण्याची, त्याला नावीन्यपूर्णता आणि करुणेची जोड देण्याची निकड आहे. चला, निरोगी भारतासाठी गैरसमज दूर करून जागरूकता पसरवण्याचा आणि योग्यवेळीच हस्तक्षेप करण्यास प्रोत्साहन देण्याचा संकल्प घेऊ या.

डॉ. गुनीषा पसरिचा, प्रमुख शास्त्रज्ञ, संसर्गजन्य रोग तज्ज्ञ, मेडजिनोम

1. https://journalofcomprehensivehealth.co.in/journey-of-tuberculosis-control-in-india-from-then-till-now/

2.https://www.who.int/teams/global-programme-on-tuberculosis-and-lung-health/tb-reports/global-tuberculosis-report-2024/tb-disease-burden/1-1-tb-incidence