चांगल्या आरोग्यासाठी योगाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. प्रत्येक आसन करण्यासाठी काही खास नियम असतात. ते नियम पाळले नाहीत तर शरीराचे नुकसान होऊ शकते. आम्ही तुम्हाला काही सर्वसाधारण नियम सांगणार आहोत ज्याचे पालन योगासनं करताना करणे गरजेचे आहे.
सुरुवातीला कठीण आसनं करू नये
जर तुम्ही पहिल्यांदाच योगा करत असाल तर कठीण आसनापासून सुरुवात करू नये. कोणतंही आसन करण्याआधी हल्का-फुल्का वॉर्मअप करायला हवा. त्यानंतर काही सोप्या आसनांपासून सुरुवात करायला हवी. जर शरीरातली कोणती नस चुकून दबली गेली तर गंभीर समस्येला तोंड द्यावे लागेल.
आसन करताना पाणी पिऊ नये
योगासनं करताना मध्येच पाणी पिऊ नये, असं केल्यास सर्दी, खोकला, ताप अशा समस्यांना तोंड द्यावे लागेल. व्यायाम करताना आपल्या शरीरातील तापमान वाढत असतं. त्यामुळे मध्येच पाणी न पिता योगा करून झाल्यावर 15 मिनिटींनी प्यावे.
माहीत असलेलीच आसने करावी
अशीच आसनं करावी ज्या आसनांबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती आहे. जी योगतज्ज्ञांकडून माहिती करून घेतली आहेत आणि त्याचे नियमदेखील तुम्हाला माहिती आहेत. स्वत:हून कोणते आसन केले तर ते घातक ठरू शकते.
मोबाईलमध्ये लक्ष न देणे
योगा करताना नेहमी तुमचा फोन बंद ठेवावा. फोन बंद ठेवला नाहीत तर तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं आणि तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. जर तुम्ही दीर्घ श्वास घेतला नाहीत तर तुमचा योगा पूर्ण होणार नाही, त्यामुळे योगासनं करताना आपल्या श्वासोच्छवासावर आपलं नियंत्रण असणं गरजेचं असतं.
नियमीत योगासनं करावी
नियमीत योगासनं करणे खूप गरजेचे असते. फक्त अधूनमधून योगासनं केली तर त्याचा शरीराला फायदा होत नाही. त्यामुळे रोजच्या रोज योगासनं करायला हवीत.