Vertigo Health Tips : चक्कर येणे किंवा अचानक डोकं गरगरु लागणं हा कोणताही गंभीर आजार नाही. तर हे एक शारीरिक कमजोरी असण्याचं लक्षण आहे. यालाच वर्टिगो (Vertigo) म्हणतात. वर्टिगो हा एक शारीरिक संतुलन संबंधित आजार आहे, जो सामान्यत: आतील कानाच्या समस्यांमुळे होतो. या त्रासामुळे अचानक असह्य संवेदना होतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला जग फिरत आहे असे वाटते. या आजारामुळे शरीराच्या वेस्टिब्युलर प्रणालीमध्ये अडथळा निर्माण होतो, जी अंतर्गत जीपीएस म्हणून कार्य करते. यामध्ये व्यक्तींना  चक्कर येणे, पडणे तसेच फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. वर्टिगो एक सामान्य आहे, जगभरातील 10 पैकी एका व्यक्तीला हा आजार होतो. भारतात वर्टिगोचे प्रमाण जवळपास 0.71 टक्‍के आहे, म्‍हणजेच 9 दशलक्षपेक्षा अधिक व्‍यक्‍तींना या आजाराचा त्रास आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 30 टक्‍के व्‍यक्‍तींमध्ये आणि 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 50 टक्‍के व्‍यक्‍तींमध्ये हा आजार दिसून येतो. महिलांनामध्ये मात्र हा आजाराचं वाढतं प्रमाण दिसतं. 


या संदर्भात प्रा. डॉ. समीर भार्गव, सल्लागार-पीडी हिंदुजा हॉस्पिटल, माजी अध्यक्ष, असोसिएशन ऑफ ऑटोलॅरिन्गोलॉजिस्ट ऑफ इंडिया म्‍हणतात, ‘’वर्टिगोबाबत जागरूकता वाढवण्‍याची गरज आहे. ज्‍यामुळे व्‍यक्‍तींना लवकरात लवकर मदत मिळू शकेल. हे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. कारण हे विविध आरोग्‍यविषयक आजारांचे लक्षण असू शकते. ज्‍यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होण्‍यासोबत फ्रॅक्‍चर्स किंवा चक्‍कर येऊन पडणे असे गंभीर आजार होऊ शकतात. व्‍यायाम आणि वैद्यकीय उपचार व्‍यक्‍तींना त्‍यांची जीवनशैली सुधारण्‍यास मदत करण्‍यामध्‍ये लाभदायी ठरू शकतात.’’


वर्टिगो आजाराची लक्षणं कोणती? 


घराभोवती गरगर फिरणे, किराणा सामान खरेदी करणे, कामावर जाणे यांसारखी रोजची कामे चक्कर आल्याने आव्हानात्मक ठरतात. सामाजिक संवादांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात, या आजाराने प्रभावित व्यक्तींना घरीच राहावे लागते. ज्यामुळे नैराश्य आणि चिंता वाढते.  महिलांमध्ये प्रमाण जास्त आढळत असल्याने हार्मोन्सवर परिणाम होतो. या आजाराचा एखाद्या व्यक्तीच्या कामावर देखील परिणाम होऊ शकतो, परिणामी नोकरी बदलणे किंवा सोडणे, कार्यक्षमता कमी होणे अशा परिणामांसह व्‍यक्‍तींवर आर्थिक परिणाम होऊ शकतो.


वर्टिगो आजारावर उपचार काय? 


या आजाराचे प्रमाण जास्त असूनही समाजात अजूनही याबाबत फारशी जागरूकता नाही. त्यामुळे अनेकांना वेळीच हा आजार कळत नाही. तसेच अनेकजण दुर्लक्ष करताना दिसतात. या आजाराची लक्षणे वर्णन आणि प्रमाणित करणे अवघड आहेत. तसेच मळमळ आणि उलट्या सारखी लक्षणे इतर स्थितींच्‍या संदर्भात स्‍पष्‍टपणे दिसून येणे अवघड असल्‍यामुळे वर्टिगोचे निदान होणे अवघड ठरू शकते. मात्र, वर्टिगोवर फिजिकल थेरपी, आहारातील बदल आणि जीवनशैलीत फेरबदल, औषधोपचार, मानसोपचार किंवा काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया करून उपचार केले जाऊ शकतात. यामध्ये वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन एक्सरसाइज समाविष्ट आहेत. यासाठी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. 


अॅबॉट इंडियाचे प्रादेशिक मेडिकल डायरेक्‍टर डॉ पराग शेठ यांनी सांगितले की, "वर्टिगो हा दुर्बल करणारा आजार आहे, ज्‍याचा व्यक्तीच्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो, पण योग्‍य काळजीसह या आजाराचे व्‍यवस्‍थापन करता येते. अॅबॉटमध्‍ये आम्ही वर्टिगोबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि विश्वसनीय उपाय सादर करण्यासाठी कटिबद्ध आहोत. अशा प्रकारे, आम्ही व्‍यक्‍तींना त्यांची स्थिती सक्रियपणे व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी वेस्टिब्युलर एक्‍सरसाइजच्या व्हिडिओ ट्यूटोरियलसह माहितीपूर्ण साहित्य प्रदान करत आहोत. हे त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यास सक्षम बनवू शकते, ज्‍यामुळे ते त्यांचे संतुलन परत मिळवू शकतील आणि पूर्ण, आरोग्‍यदायी जीवन जगू शकतील.”


जीवनशैलीत सुधारणा केल्यास तसेच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास या आजारावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Vitiligo Leukoderma : त्वचेवर दिसणारे पांढरे डाग कसे तयार होतात? असू शकतो Vitiligo आजार; वेळीच ओळखा 'ही' लक्षणं