Health: पावसाळा सुरू झाला की सर्दी, नाक चोंदणे किंवा सतत नाक वाहणे यासोबतच अनेकांना कान दुखणे, कान मोल साचल्यासारखे वाटणे आणि चेहऱ्यावर जडपणा जाणवू लागतो. बाहेरचा पाऊस, हवेतला ओलावा आणि अचानक बदलणारे तापमान यामुळे हा त्रास अधिक तीव्रतेने जाणवतो. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कानाचा किंवा सायनसचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात अशा त्रासांकडे दुर्लक्ष न करता योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. मुंबईच्या घाटकोपर येथील झायनोवा शाल्बी हॉस्पिटलमधील कान,नाक,घसा विकार तज्ज्ञ डॉ. सलोनी राज्यगुरू यांनी पावसाळ्यात कान नाक घसा संसर्गापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी हे सांगितले आहे.

Continues below advertisement

पावसाळ्यात कन नाक घश्याच्या कोणत्या समस्या जाणवतात?

पावसाळ्यात कानाचा संसर्ग, कानाच्या मधल्या भागात होणारा संसर्ग तसेच कानाच्या आत होणारा बुरशीजन्य संसर्ग अनेकांमध्ये आढळतो. त्याचप्रमाणे सायनसची समस्या उद्भवते. संसर्ग किंवा अॅलर्जी झाल्यास नाक आणि सायनसच्या आतील आवरणाला सूज येते आणि अतिरिक्त चिकट स्राव तयार होतो. त्यामुळे नाक चोंदणे व चेहऱ्यावर जडपणा जाणवू शकतो.

कानाच्या मधला भाग आणि नाकाच्या मागील भागाला युस्टेशियन ट्यूब जोडते. कानातील दाब संतुलित ठेवणे आणि कानात साचलेला द्रव बाहेर जाण्यास मदत करणे हे तिचे काम आहे. मात्र, नाक बंद होणे आणि सूज वाढल्यास ही नलिका बंद होऊ शकते. त्यामुळे मधल्या कानात द्रव साचून कान दुखणे, कानावर दाब जाणवणे किंवा कानाचा संसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात अॅलर्जी, सर्दी-खोकल्यासारखे विषाणूजन्य संसर्ग आणि सतत ओलसर वातावरणात राहणे यामुळे कान आणि सायनसच्या समस्या वाढू शकतात. ज्यांना आधीपासून अॅलर्जिक राइनायटिस, वारंवार सायनसचा त्रास किंवा सर्दी होण्याची समस्या आहे, त्यांना याचा धोका अधिक असू शकतो.

Continues below advertisement

संसर्ग टाळण्यासाठी अशी घ्या खबरदारी

पावसाचे पाणी कानात गेले असल्यास ते जास्त वेळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

  • कानाच्या आत कापसाच्या काड्या किंवा इतर कोणतीही वस्तू खोलवर घालू नये. नाक बंद होत असल्यास पुरेसे द्रवपदार्थ घ्यावेत.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने गरज असल्यास सलाईन स्प्रे वापरता येतो.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून अँटिबायोटिक्स किंवा नाक मोकळे करणारे स्प्रे वापरू नयेत.
  • वैयक्तिक स्वच्छता राखावी. तसेच वातानुकूलित थंड वातावरणातून वारंवार बाहेरील दमट आणि उष्ण वातावरणात जाणे टाळावे.
  • तापमानातील अशा अचानक बदलांमुळे काही व्यक्तींमध्ये नाक बंद होण्याचा त्रास वाढू शकतो.
  • कान दुखणे, ऐकू कमी येणे, ताप येणे, चेहऱ्यावर वेदना जाणवणे किंवा नाकातून घट्ट चिकट स्राव येणे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • या लक्षणांकडे दुर्लक्ष करून स्वमर्जीने औषधे घेणे टाळावे.

पावसाळ्यात कान, नाक आणि सायनसचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी स्वच्छता, योग्य काळजी आणि लक्षणे दिसताच वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात थंड पेये आणि आईस्क्रीमचे सेवन टाळण्याचा सल्लाही तज्ज्ञाकडून दिला जातो. योग्य खबरदारी घेतल्यास पावसाळ्यात होणाऱ्या कान आणि सायनसच्या त्रासापासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.