Eye health in Rainy season: पावसाळ्याच्या आगमनाने कडक उन्हापासून दिलासा मिळतो. पावसामुळे धूळ, धूर आणि प्रदूषण कमी होऊन वातावरण स्वच्छ होते. हवेत गारवा आणि आर्द्रता वाढते. त्यामुळे अनेकांना वाटते की या ऋतूमध्ये डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या कमी होईल. मात्र, प्रत्यक्षात पावसाळ्यात ड्राय आय (डोळे कोरडे पडणे) या समस्येचे प्रमाण उलट वाढताना दिसते. चेंबूरमधील डॉ अग्रवालस् आय हॉस्पिटल कॉर्निया कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉ. मीनल कान्हेरे यांनी पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यायची हे सांगितलंय.

Continues below advertisement

पावसाळ्यात डोळे कोरडे का होतात?

भारत, विशेषतः महाराष्ट्र, मुसळधार पावसासाठी ओळखला जातो. अनेकदा दिवसभर पाऊस सुरू असतो. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत अनेकजण घरातूनच काम (Work From Home) करण्यास प्राधान्य देतात. अनेक पालकही जोरदार पावसाच्या दिवशी मुलांना शाळेत पाठवणे टाळतात.

Continues below advertisement

पावसाळ्यात घरात अधिक वेळ घालवल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनशैलीत अनेक बदल होतात आणि याच बदलांमुळे डोळे कोरडे पडण्याच्या समस्या वाढतात. घरात राहिल्यामुळे लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. केवळ प्रौढच नव्हे तर लहान मुलांचाही स्क्रीन टाइम वाढतो. पावसाळी वातावरणात चित्रपट किंवा वेब सिरीज सलग पाहण्याची सवय अनेकांना असते. त्यातच बंद खिडक्या आणि एअर कंडिशनरचा दीर्घकाळ वापर यामुळे डोळ्यांवर अधिक ताण येतो.

स्क्रीनकडे एकटक पाहताना आपण पापण्या लवण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील अश्रू लवकर आटतात आणि डोळे कोरडे पडतात. परिणामी डोळे लाल होणे, जळजळ, खाज येणे, डोळे थकणे, ताण जाणवणे आणि सूज येणे अशा समस्या निर्माण होतात. पावसाळ्यात डोळ्यांच्या अॅलर्जीचे प्रमाणही वाढते आणि त्यामुळे विशेषतः मुलांमध्ये ड्राय आयची लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात.

पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

डोळे निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे.

• सलग आणि दीर्घकाळ स्क्रीनचा वापर टाळा. 

• 20-20-20 नियम पाळा – दर 20 मिनिटांनी, 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पाहा. 

• जाणीवपूर्वक वारंवार पापण्या लवण्याची सवय लावा. 

• स्क्रीन डोळ्यांच्या पातळीपेक्षा किंचित खाली ठेवा, त्यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो. 

• एसी किंवा पंख्याच्या थेट हवेच्या प्रवाहात बसणे टाळा, कारण त्यामुळे अश्रू लवकर आटतात. 

• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स (कृत्रिम अश्रू) वापरा. 

• दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा. 

• डोळ्यांशी संबंधित कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

डोळ्यांची निगा राखणे आवश्यक

पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या वाढण्यामागे केवळ ऋतू कारणीभूत नसतो, तर या काळात आपण स्वीकारलेली जीवनशैली हे त्यामागचे प्रमुख कारण असते. वाढलेला स्क्रीन टाइम, एसीचा वापर आणि घरात जास्त वेळ राहण्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे स्वतःमध्ये आणि मुलांमध्ये निरोगी स्क्रीन सवयी विकसित करणे, नियमित विश्रांती घेणे आणि डोळ्यांची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या छोट्या सवयी पावसाळाभर डोळे आरामदायी, निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यास मदत करतील.