पुणे : लहान मुलांमधील किडनीच्या आजाराची लक्षणे व उपाय कोणते याबाबत या लेखातून माहिती मिळेल. कारण, एका संशोधनातून लहान मुलांमध्ये किडनी (Kidney) विकाराचं प्रमाण वाढीस लागल्याचं पाहायला मिळत आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस - भटिंडा आणि विजयपूर आणि द जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ इंडियाच्या संशोधकांनी मुलांचे राष्ट्रीय पोषण सर्वेक्षण (CNNS) केलेल्या संशोधनानुसार 2016 ते 2018 दरम्यान 5-19 वर्षे वयोगटातील 24,690 मुले म्हणजेच 4.9 टक्के व प्रति 10 लाख लोकसंख्येतील 49,000 प्रकरणांमध्ये मुलांना किडनी विकार आढळून आला आहे. त्यामुळे, तज्ज्ञ डॉक्टरांनी (Doctor) यावर लक्षणे व उपाय सांगत मोलाचा सल्ला दिला आहे.
मूत्रपिंडाचा आजार केवळ प्रौढांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही आढळून येतो. मूत्रपिंडाच्या आजारामुळे (मूत्रपिंडाचा बिघाड) किडनीचे कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते आणि त्याच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. एखाद्याचे मूत्रपिंड निकामी होऊ शकतो. अचानक तीव्र मूत्रपिंडाचा आजार सुरू होतो. मुलांमध्ये मूत्रपिंडाच्या आजारास कारणीभूत जोखीम घटकांमध्ये जन्मजात विकृती, अनुवांशिक विकार, मूत्रमार्गाचे संक्रमण, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, नेफ्रोटिक सिंड्रोम, हेमोलाइटिक युरेमिक सिंड्रोम, ल्युपस सारखे विकार, ठराविक औषधांचे सेवन, निर्जलीकरण आणि आघाताने किंवा मूत्रपिंडाला झालेली दुखापत यांचा समावेश आहे.
लक्षणे कोणती?
किडनीचा विकार असलेल्या मुलांना रक्तस्त्राव, ताप, पुरळ, शौचावाटे रक्त, उलट्या, लघवी न होणे किंवा भरपूर लघवी होणे, त्वचेचा रंग फिका पडणे, ऊतींना सूज येणे, भूक न लागणे आणि वाढ खुंटणे यासारखी लक्षणे दिसतात. ही लक्षणे मुलाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात आणि दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय आणू शकतात.
उपचार:
उपचारांमध्ये ठराविक औषधं, आहारातील बदल आणि रक्तातील क्षार (इलेक्ट्रोलाइट्स) जसे की पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियमचे निरीक्षण केले जाऊ शकते. मूत्रपिंडाला तीव्र दुखापत असलेल्या तसेच कायमस्वरूपी मूत्रपिंड निकामी झालेल्यांसाठी डायलिसिसचा सल्ला दिला जातो. तसेच अंतिम टप्प्यातील मूत्रपिंडाचा आजार असलेल्यांसाठी किडनी प्रत्यारोपण हा शेवटचा उपचार पर्याय उपलब्ध असेल. मुलांमध्ये किडनीचे आजार होऊ नयेत, याची पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रतिबंधात्मक उपाय
· पालकांनी योग्य हायड्रेशन सुनिश्चित केले पाहिजे: मुलांना दिवसभर हायड्रेटेड राखणे गरजेचे आहे. ज्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यात मदत होईल आणि त्यांच्या मूत्रपिंडाचे कार्य सुधारते.
· पुरक आहाराची निवड करा: मुलांनी फळे, भाज्या आणि तृणधान्यांचा समावेश असलेला समतोल आहार घ्यावा. पालकांनी मुलांच्या पोषणाकडे विशेष लक्ष द्यावे. प्रक्रिया केलेले अन्न, अधिक प्रमाणात मीठाचे सेवन आणि शर्करायुक्त पेयांचे सेवन मर्यादित करणे ही मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी चांगली सवय आहे.
· वजन नियंत्रित राखा: लठ्ठपणामुळे मूत्रपिंडाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो, म्हणून नियमित शारीरिक हालचाली आणि वजन नियंत्रित खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन द्या.
· मूत्रमार्गाच्या संसर्गावर उपचार करा (UTIs): उपचार न केल्यास मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. तुमच्या मुलाला मूत्रमार्गाच्या संसर्गाची शक्यता असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
· रक्तदाबाचे निरीक्षण करा: विविध अभ्यासानुसार, उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाचा आजार होण्याची शक्यता वाढते असे दिसून आले आहे. त्यामुळे रक्तदाब सामान्य पातळीत मर्यादेत ठेवा आणि मूत्रपिंडाच्या समस्या टाळा.
· आरोग्याच्या समस्यांचे त्वरित व्यवस्थापन करा: पालकांनो, जर तुमच्या मुलाला मधुमेह किंवा इतर जुनाट आजार असतील तर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांनी त्याचे व्यवस्थापन करा.
· तुमचा कौटुंबिक इतिहास जाणून घ्या: मूत्रपिंडाच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास असल्यास, दररोज मूत्रपिंडाच्या कार्याचे योग्य निरीक्षण करा आणि बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.
· नियमित तपासण्या चुकवू नका: किडनीला कोणतेही नुकसान होणार नाही खात्री करत वैद्यकिय तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घ्या.
हेही वाचा
मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार