Continues below advertisement

Health Tips : थायरॉईड (Thyroid) ही केवळ महिलांची समस्या समजली जात होती. मात्र, बदलती जीवनशैली, सततचा तणाव, प्रदुषण, आहाराच्या अनियमित वेळा आणि वाढते प्रदूषण यामुळे आता पुरुषांमध्येही थायरॉईड विकारांचे प्रमाण वाढले आहे.

थायरॉईडच्या समस्या या सर्वच वयोगटातील पुरुष आणि महिलांना प्रभावित करू शकतात. वाढता ताण, चुकीची जीवनशैली आणि प्रदूषण यांसारखी विविध कारणे विशेषतः शहरी भागात थायरॉईडच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

Continues below advertisement

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जेवण वगळणे, अनियमित वेळा, मध्यरात्री खाणे, प्रक्रिया केलेल्या अन्नावर अवलंबून राहणे आणि जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन करणे यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. थायरॉईड ग्रंथी या चयापचय प्रक्रिया, ऊर्जेची पातळी आणि वजन नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जेव्हा जेवणाच्या वेळा अनियमित असताच आणि पुरक आहाराची कमतरता असते तेव्हा थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करत नाही. कामाचे वाढते तास, झोप न लागणे आणि सततचा ताण यामुळे हार्मोनल असंतुलन वाढते. ज्यामुळे थकवा येणे, वजन वाढणे अथवा कमी होणे, केस गळणे आणि मासिक आरोग्यातही बदल दिसून येतात. म्हणूनच थायरॉईड संतुलनावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

प्रदूषण आणि थायरॉईड आरोग्य :

सध्या देशभरात वायू प्रदूषणाची समस्या वाढत आहे. त्यामुळे प्रदुषित हवा आणि हानिकारक रसायनांच्या संपर्कात येणे ही देखील थायरॉईड समस्यांची प्रमुख कारणं आहेत. जड धातू, कीटकनाशके आणि औद्योगिक रसायनांसारख्या प्रदूषकांमुळे हार्मोनल असंतुलनाची समस्या उद्भवू शकते. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासांनुसार दीर्घकाळ प्रदूषित हवेच्या संपर्कात राहिल्याने थायरॉईड ग्रंथी कमी किंवा जास्त सक्रिय होण्याची शक्यता असते. शहर किंवा औद्योगिक भागात राहणाऱ्या लोकांना थायरॉईडच्या समस्यांचा धोका असू शकतो.

पुरुषांमधील थायरॉईड विकाराची लक्षणं आणि कारणे :

महिलांप्रमाणेच, पुरुषही थायरॉईडच्या समस्यांचा सामना करतात. तथापि, पुरुषांमधील थायरॉईडच्या समस्यांची नोंद होत नाही कारण त्यांची लक्षणे इतर आजारांच्या लक्षणांसारखीच असतात. या धोक्याच्या लक्षणांकडे अनेकदा ताण किंवा वाढते वय म्हणून दुर्लक्ष केले जाते. पुरुषांनी अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, सतत थकवा, कमी झालेला स्टॅमिना, नैराश्य, केस पातळ होणे, स्नायूंचा अशक्तपणा आणि लैंगिक आरोग्याच्या समस्या यांसारख्या लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे. वाढता ताणतणाव, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, मद्यपान आणि कौटुंबिक इतिहास ही याची प्रमुख कारणं आहे. निदानास विलंब झाल्याने भविष्यातील गुंतागुंत वाढु शकते.

निदानामध्ये रक्त तपासण्यांचा समावेश असतो, ज्यामध्ये थायरॉईड संप्रेरकांची पातळी मोजण्याचा रुग्णाला सल्ला दिला जातो. यशस्वी उपचारांसाठी वेळीच निदान महत्त्वाचे आहे. त्वरित उपचार घेतल्याने पुरेसा आराम मिळण्यास मदत होते.

यावरील उपचार हे थायरॉईडच्या प्रकारावर अवलंबून असतात आणि त्यात औषधोपचार, जीवनशैलीतील बदल जसे की व्यायाम, पौष्टिक आहार, योग आणि ध्यानधारणेच्या स्वरूपात तणावाचे व्यवस्थापन आणि दर सहा महिन्यांनी नियमित तपासणीचा समावेश असू शकतो. याव्यतिरिक्त, पुरेशी झोप घेणे आणि घराबाहेर पडण्यापूर्वी मास्कचा वापर करणे आणि विशिष्ट भागातील हवेची गुणवत्ता तपासून मगच बाहेर पडणे हे थायरॉईडचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.

महिला तसेच पुरुषांनी देखील थायरॉईडच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वरिल उपायांचे काटेकोरपणे पालन करुन निरोगी जीवनाचा आनंद घ्या.

- डॉ. प्रशांत केवले, ईएनटी, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय, मुंबई

हे ही वाचा :

Health Tips : हिवाळ्यात वाढता फ्लू आणि न्यूमोनियाला दूर ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' 5 टिप्स; वाचा आरोग्य तज्ज्ञांचं मत