Health Tips : शुक्राणूंची संख्या (Sperm Count) म्हणजे वीर्यच्या (Semen) एका नमुन्यात आढळून आलेल्या शुक्राणूंची सरासरी संख्या होय. प्रजनन तज्ज्ञ नियमित वीर्य तपासणी दरम्यान शुक्राणूंची संख्या तपासतात आणि ते प्रजननक्षमतेसाठी (Fertility) एक आवश्यक निर्धारक मानतात. प्रजनन क्षमतेसाठी स्त्री आणि पुरुष दोघांचेही आरोग्य सदृढ असणे आवश्यक आहे. मुलाला जरी जन्म पुरुष देत नसले तरी वडिलांचे आरोग्य, विशेषत: त्यांच्या शुक्राणूंची स्थिती, तुम्ही गर्भवती व्हाल की नाही यावर परिणाम होतो.


शुक्राणूंची संख्या कमी असल्यास त्यांची अंड्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता देखील कमी होते. पुरुषांच्या वीर्यामध्ये नेहमीपेक्षा कमी शुक्राणू असणे हे शुक्राणूंची संख्या दर्शवते. पुरुषांच्या वीर्यात प्रति मिलीलीटर 15 दशलक्ष ते 200 दशलक्ष शुक्राणू असणे ही शुक्राणूंची सामान्य संख्या मानली जाते. ही संख्या 15 दशलक्षांपेक्षा कमी असल्यास शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे म्हटले जाते.


शुक्राणूंची संख्या कमी म्हणजे किती?


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) 2010 च्या अहवालामध्ये असे देखील नमूद केले आहे की प्रति मिलीलिटर 15 दशलक्षपेक्षा कमी शुक्राणूंची संख्या ही कमी मानली जाते. पुरुष वंध्यत्व हे नेहमी कमी शुक्राणूंच्या संख्येमुळेच उद्भवत नाही. तर, इतरही काही कारणे आहेत. म्हणून तुमच्या शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करा.


व्यायामाची जोड द्या


शुक्राणूंची संख्या वाढवण्याचा उत्तम पर्याय म्हणजे व्यायाम. टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि शुक्राणूंची गुणवत्ता दोन्ही देखील नियमित व्यायामाने वाढू शकतात. संशोधनानुसार जे पुरुष आठवड्यातून किमान तीन वेळा सुमारे एक तास व्यायाम करतात त्यांच्यात शुक्राणूंची संख्या जास्त असल्याचे दिसून आले आहे. टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी वेट ट्रेनिंगचा विशेष फायदा होतो. मात्र अति व्यायाम केल्यास तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी कमीही होऊ शकते. त्यामुळे प्रशिक्षकांच्या सल्ल्याने व्यायाम करा.


2. पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करा.


गर्भधारणेदरम्यान केवळ महिलांनाच नव्हे तर पुरुषांना देखील प्रजनन क्षमता वाढवणाऱ्या आहारातील पोषक तत्वांची आवश्यकता असते. संशोधनानुसार वडील होऊ इच्छिणाऱ्यांना देखील सी आणि ई जीवनसत्त्वयुक्त आहार आणि फॉलिक अॅसिडची आवश्यकता असते. पालेभाज्या, फळे, तृणधान्यांमध्ये हे जीवनसत्व आढळतात. अक्रोड, फळे आणि भाज्या यांसारख्या अँटिऑक्सिडंट्सचे उच्च प्रमाण असलेले पदार्थ देखील शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त, जीवनसत्त्वे सी, डी, आणि ई, झिंक, सेलेनियम, फॉलिक अॅसिड आणि ओमेगा -३ फॅटी अॅसिड सारख्या चांगल्या फॅट्सची कमतरता शुक्राणूंचे प्रमाण आणि गुणवत्तेवर परिणामकारक ठरतात.


3. तणावाचे व्यवस्थापन करा


योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करा तसेच शरीराची मालिश करा. तणाव कमी करण्यासाठी आवडते छंद जोपासा, संगीत ऐका.


4. घट्ट कपडे घालणे टाळा.


घट्ट कपडे परिधान केल्यामुळे स्त्रियांबरोबरच पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो ज्यामुळे शुक्राणूंचे उत्पादन कमी होऊ शकते. संशोधनानुसार घट्ट कपडे घालणाऱ्या पुरुषांपेक्षा सैलसर कपडे घालणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.


5. मद्यपान आणि धूम्रपान टाळा


कमी शुक्राणूंची संख्या ही विविध औषधांचा मारा आणि धूम्रपान यांच्याशी संबंधित आहे. संशोधनानुसार जे पुरुष धूम्रपान करतात त्यांच्यातील कामवासना कमी होऊन हळूहळू ते वंधत्वाचे शिकार ठरतात. याव्यतिरिक्त, धूम्रपान, औषधांचा वापर आणि मद्यपानाचा दुष्परिणाम होतो.
 
आहारातील योग्य बदल, जीवनशैलीत बदल, व्यायाम करून पुरुषाला शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करते. नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे तसेच धुम्रपान आणि मद्यपान तसेच व्यसनाधीन पदार्थांपासून दूर राहणे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेवर चांगले परिणाम करते. स्वतःच्या मर्जीने औषधोपचार करु नका.


डॉ. माधुरी रॉय, स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, कन्सिव्ह आयव्हीएफ, पुणे


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.