Continues below advertisement

Health Tips : ऑस्टियोपोरोसिसचे (Osteoporosis) म्हणजे हाडांना येणारा ठिसूळपणा. हा एक प्रकारचा हाडांचा आजार असून या आजारात हाडे ठिसूळ बनतात. यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. ऑस्टियोपोरोसिस म्हणजे शारीरिक हालचालींवर मर्यादा येणे असे नाही. आधुनिक उपचार पद्धतीने आता या आजाराने ग्रस्त रुग्णांना निरोगी जीवनशैली जगणे आणि त्यांची हाडे मजबूत ठेवणे शक्य आहे. जीवनशैली योग्य बदल, संतुलित आहार आणि योग्य काळजी घेतल्यास, तुमच्या हाडांचे संरक्षण करणे आणि आत्मविश्वासाने जगणे शक्य आहे.

याच संदर्भात डॉ. निखिल भारंबे, ऑर्थोपेडिक सर्जन, मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणतात की, 'ऑस्टियोपोरोसिस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये हाडं कमकुवत होतात. किरकोळ अपघात किंवा साध्या हालचालींमुळे देखील फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. याचा परिणाम अनेकदा वयस्कर व्यक्तींवर, विशेषतः रजोनिवृत्तीनंतर महिलांवर होतो. हा आजार कोणालाही होऊ शकतो. हल्ली जंक फूड आणि स्ट्रीट फूड खाण्याच्या सवयींमुळे देखील तरुण पिढीचे आरोग्य बिघडत चालले आहे.'

Continues below advertisement

ऑस्टियोपोरोसिससह जगताना 'या' टिप्स नक्की फॉलो करा

हाडांना पोषक आहार निवडा :

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांचा आहारात समावेश करा. दूध, दही, चीज, हिरव्या पालेभाज्या, बदाम आणि मासे या पदार्थाचा रोजच्या आहारात समावेश करा. हे पोषक घटक हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक आहेत. जंक फूड, तेलकट, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया पदार्थांचे सेवन टाळा.

दररोज न चुकता व्यायाम करा :

चालणे, योगा किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंगसारखे हलके वजन उचलण्याचे व्यायाम करा. नियमित व्यायामामुळे शारीरिक संतुलन राखणे, स्नायूंची बळकटी आणि हाडांची घनता सुधारण्यास मदत होते. फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.

निरोगी हाडांसाठी दररोज किमान 20 मिनिटे पुरेसा सूर्यप्रकाश घ्या. सकाळी 7 ते 9 या वेळेत पुरेसा सूर्यप्रकाश मिळविण्याचा प्रयत्न करा.

धूम्रपान आणि मद्यपानाचे व्यसन सोडा :

विविध अभ्यासांनुसार, हे वाईट व्यसनांमुळे हाडं कमकुवत होऊ शकतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. म्हणून, सावधगिरी बाळगा आणि तुमच्या हाडांचे संरक्षण करण्यासाठी धूम्रपान आणि मद्यपानाचे व्यसन सोडा.

लहान मोठ्या अपघातापासून स्वत:चे संरक्षण करा :

आपले घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करा, जमीनीवर पाय घसरणार नाही यासाठी विशेष काळजी घ्या तसेच घसरण्याचा धोका कमी करण्यासाठी चांगली प्रकाश व्यवस्था सुनिश्चित करा. घसरु नये म्हणून आधारासाठी हँडल वापरा, ओले, निसरडे आणि असमान पृष्ठभागावर चालणे टाळा. योग्य पादत्राणांची निवड करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही अवघड काम करू नका.

हाडे मजबूत राहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं किंवा पूरक आहाराचे सेवन करा. या महत्त्वाच्या धोरणांचे अनुसरण करा आणि तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारा. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार हाडांची घनता तपासा आणि त्याकरिका वार्षिक तपासणी करायला विसरु नका. वरील महत्त्वाच्या टिप्सचे अनुसरण करून तुम्हाला तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारता येऊ शकते.

हे ही वाचा : 

कोल्ड्रिफसह 'हे' 2 कफ सिरप चुकुनही मुलांना देऊ नका, WHO ची शिफारस,खोकल्यावर उपयोगी ठरतील हे 5 घरगुती उपाय