Indian cough syrup banned: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने नुकतीच एक हेल्थ अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यानुसार भारतात तयार करण्यात आलेल्या 3 खोकल्याच्या सिरपचा वापर आणि वितरण थांबवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात या औषधांमुळे देशात तब्बल 25 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Cough Syrup Ban)
कोणते कफ सिरपवर बंदी?
WHO ने ज्यांच्यावर बंदीची शिफारस केली आहे त्या सिरप आहेत, कोल्ड्रिफ (Coldrif), रेस्पीफ्रेश टीआर (Respifresh TR) आणि रीलाइफ (Relife). ही औषधे अनुक्रमे स्रिसन फार्मास्युटिकल्स, रेडनेक्स फार्मा, आणि शेप फार्मा यांनी तयार केली होती. तपासात या सिरपच्या काही बॅचमध्ये डायथिलीन ग्लायकॉल (Diethylene Glycol - DEG) हे विषारी रसायन प्रमाणापेक्षा खूप जास्त प्रमाणात आढळले आहे.
WHO ची शिफारस
हे रसायन मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान, मेंदूवर परिणाम आणि विशेषतः लहान मुलांमध्ये मृत्यूपर्यंत धोका निर्माण करू शकते. त्यामुळे WHO ने जागतिक आरोग्य संस्थांना आणि तज्ज्ञांना विनंती केली आहे की, या कंपन्यांनी डिसेंबर 2024 नंतर तयार केलेल्या सर्व औषधांची काटेकोर तपासणी करावी, आणि तपासणीशिवाय कोणतेही औषध बाजारात विकले जाऊ नये याची काळजी घ्यावी.
कफ सिरपमुळे मुलांचे मृत्यू
गेल्या महिन्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, ज्यांनी हे सिरप घेतले त्या मुलांना सुरुवातीला फक्त साधा खोकला-ताप होता. पण काही दिवसांतच किडनी फेल्युअरची लक्षणं दिसू लागली आणि त्यांचा मृत्यू झाला. तपासात DEG चे प्रमाण अत्यंत धोकादायक स्तरावर असल्याची पुष्टी झाली.
ही पहिलीच वेळ नाही. २०२२ मध्येही भारतातील मेडन फार्मास्युटिकल्सच्या कफ सिरपमुळे गँबिया आणि इंडोनेशिया येथे ८० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला होता. या औषधांमधील रसायनं मेंदू, फुफ्फुसे, यकृत आणि मूत्रपिंडावर गंभीर परिणाम करतात. मुलांना होणारा कफ, सर्दी खोकला बरा करण्यासाठी हे घरगुती उपाय कामी येऊ शकतात.
कोमट मध (1 वर्षांवरील मुलांसाठी)
तज्ञांच्या मते, कोमट मध खोकल्यासाठी अतिशय उपयोगी ठरतो. तो गळ्याला आराम देतो आणि रात्री होणारी खोकला कमी करतो. झोपण्यापूर्वी अर्धा चमचा कोमट मध दिल्यास मोठा फरक जाणवतो. एक वर्षाखालील बाळांना कधीही मध देऊ नये. यामुळे 'इन्फंट बोटुलिझम' हा गंभीर आजार होऊ शकतो.
वाफ घेणे (स्टीम इनहलेशन)
खोकला आणि जकडण कमी करण्यासाठी हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. गळा आणि नाकातील श्लेष्मा सैल होतो आणि श्वास घेणे सोपे होते. मुलाला १० मिनिटे बाथरूममधील गरम पाण्याच्या वाफेत बसवा किंवा कूल मिस्ट ह्युमिडिफायर वापरा.
लिंबू आणि कोमट पाणी
लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन C संसर्गाशी लढण्यास मदत करते. कोमट पाणी गळ्याला आराम देते. थोडा नींबू रस आणि अर्धा चमचा मध कोमट पाण्यात मिसळून मुलाला सावकाश पाजा.
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
कोमट पाणी आणि थोडं मीठ मिसळून केलेल्या गुळण्या गळ्याची सूज कमी करतात आणि बॅक्टेरिया नष्ट करतात. मात्र हा उपाय तेव्हाच करा जेव्हा मूल सुरक्षितपणे गुळण्या करू शकते.
गरम सूप आणि द्रव पदार्थ
गरम सूप, शोरबा किंवा हलका अद्रकाचा काढा मुलाच्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही आणि खोकल्यात आराम देतो.
अद्रक घातलेला चहा
आल्यामध्ये सूज कमी करणारे गुणधर्म असतात. थोड्या पाण्यात अद्रकाचे तुकडे उकळा, गाळून त्यात थोडा मध मिसळा आणि गार झाल्यावर मुलाला द्या. हे गळ्याला शांत करते आणि खोकला कमी करते.