Kangaroo Method: कांगारु मदर केअर म्हणजे प्रसुतीनंतर आई आपल्या बाळाला कांगारू प्रमाणे आपल्या छातीजवळ ठेवते. या काळात आई आपल्या मुलाची पूर्ण काळजी घेते. वैद्यकीय भाषेत याला ‘स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट’ (skin to skin contact) असे म्हणतात. हे नवजात बाळाचे संरक्षण करते. ‘कांगारू केअर’ पद्धती अंतर्गत आई बाळाला जास्त काळ स्तनपान करू शकते. त्याच वेळी, बाळही स्तनपान करण्यास शिकते. यामुळे मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा पूर्ण विकास होतो. यासोबतच मुलाचे विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होते.

पालकांच्या त्वचेशी बाळाच्या त्वचेचा थेट संपर्क

पुण्यातील औंधमधील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनच्या नवजात शिशु आणि बालरोग तज्ञ डॉ. अनुषा राव सांगतात, यामध्ये बाळाला त्याच्या पालकांच्या उघड्या छातीशी घट्ट कवटाळून ठेवले जाते, अशाप्रकारे पालकांच्या त्वचेशी बाळाच्या त्वचेचा थेट संपर्क होत राहतो, सर्व नवजात बाळांच्या बाबतीत या पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो. अकाली तसेच सामान्य प्रसूती होऊन जन्मलेल्या बाळांच्या तब्येतीची नीट काळजी घेण्यासाठी कांगारू केयर हे तंत्र उपयुक्त ठरते. बाळाची नीट काळजी घेण्याचा आणि बाळासोबत आपले बंध निर्माण करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. या पद्धतीचा वापर करून शुश्रूषा करण्यात आलेल्या बाळांची पालकांसोबत खूप जास्त जवळीक निर्माण होते.

कांगारू पद्धत म्हणजे काय?

कांगारू काळजी ही नवजात बाळांची काळजी घेण्याची एक विशेष पद्धत आहे, विशेषतः जे अकाली जन्माला आले आहे किंवा ज्यांचे जन्मतः वजन कमी आहे अशा बाळांमा कांगारू केअरमध्ये आईचा शरीरस्पर्श बाळाला नैसर्गिक उब देतो, ज्यामुळे त्याच्या शरीराचे तापमान स्थिर राहते आणि हृदय व श्वसन प्रणाली सुधारते. ही पद्धत संसर्गाचा धोका कमी करते आणि बाळ लवकर वाढते. पद्धतीमुळे आईच्या स्तनातील दूधप्रवाह वाढतो आणि बाळाला अधिक वेळ स्तनपान करता येते. यामुळे बाळाला पोषण मिळतं आणि त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

कांगारू केअर दरम्यान काय होते?

कांगारु केअरमध्ये बाळाला आईच्या छातीशी घट्ट चिकटवून ठेवले जाते, अगदी कांगारूच्या पिशवी सारखे. यामध्ये बाळाला सरळ स्थितीत, तुमच्या उघड्या छातीवर, फक्त डायपर आणि डोक्यावर टोपी घालून ठेवतात. त्यानंतर बाळाला वरून उबदार ब्लँकेट ने झाकले जाते. आईच्या त्वचेशी येणारा हा संपर्क बाळाला गर्भाशयाबाहेरील जीवनाशी जुळवून घेण्यास मदत करतो. अकाली जन्मलेले, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याकरिता, श्वासोच्छ्वास आणि आहार यासारख्या अनेक आरोग्य समस्यांशी झुंजणाऱ्या बाळांकरिता हे एक वरदान ठरते. कांगारू केअर हे बाळामध्ये उबदारपणा, आराम आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करते.

बाळाशी बंध निर्माण करण्यास मदत

कांगारू केअर बाळाशी बंध निर्माण करण्यास मदत करते, आईच्या दुधाचे उत्पादन वाढवते आणि बाळ आणि पालक दोघांमधील ताण कमी करते. हे समजून घ्या की कांगारू केअरमध्ये येणाऱ्या त्वचेच्या संपर्काद्वारे ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन सारख्या संप्रेरकांना उत्तेजित करून आईच्या दुधाचे उत्पादन वाढविण्यास मदत होते. यामुळे स्तनपान करणे देखील सोपे होते, कारण अशा स्थितीत बाळ स्तनपान चांगल्या प्रकारे करतात आणि त्यांना अधिक प्रभावीपणे दूध पाजता येते. पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत कांगारू मदर केअर हे स्तनपान लवकर सुरू करण्यास प्रोत्साहन देते. म्हणून, कांगारू केअर बाळांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

कांगारू इतर फायदे कोणते? 

बाळाच्या हृदयाचे ठोके, तापमान आणि श्वासोच्छवासाचे नियमन करण्यास मदत होते

चांगली झोप आणि जलद वजन वाढण्यास प्रोत्साहन देते

बाळ आणि पालकांमधील भावनिक बंध मजबूत करते.

संसर्गाचा धोका कमी करता येतो.

बाळाचे रडणे कमी होते आणि बाळ शांत होते.

नवमातांनी या टिप्सचे पालन करा

मातांनी कमीत कमी आवाज आणि लक्ष विचलित न करणारी शांत, स्वच्छ जागा निवडणे गरजेचे आहे.

हात स्व्छ धुवा आणि बाळाच्या शरीरावर ओरखडे येतील शकतील असे कोणतेही दागिने घालू नका.

समोरच्या दिशेने उघडता येईल असा टॉप किंवा हॉस्पिटलचा गाऊन घाला जेणेकरुन बाळाच्या त्वचेचा आईच्या त्वचेशी संपर्क साधता येईल.

तुमच्या बाळाला तुमच्या उघड्या छातीवर सरळ धरा. डोके एका बाजूला वळलेले असेल याची खात्री करा.

दोघांनाही उबदार ठेवण्यासाठी मऊ ब्लँकेट किंवा स्वच्छ कपडाने झाकून घ्या.

कमीत कमी एक तास या स्थितीत रहा आणि दिवसभरात शक्य तितक्या वेळा ही क्रिया करा.

तुमच्या बाळाशी हळूवारपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा कारण तुमचा आवाज त्यांना शांत करण्यास मदत करेल. म्हणून, लक्षात ठेवा, दररोज कांगारू केअरचा सराव करून, तुम्ही नवजात बाळाच्या विकासासाठी प्रयत्न करा.