मुंबई : हल्ली पुरुष आणि महिलांमध्ये केस गळतीची समस्या ही सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे. ज्यामुळे अनेकदा ताण येतो आणि आत्मविश्वासावर परिणाम होतो. बरेच लोक प्रदूषण, आहार किंवा कामाचा ताण यासारख्या जीवनशैलीच्या घटकांना केस गळतील कारणीभूत घटक मानतात मात्र या बरोबरच, थायरॉईड असंतुलन हे देखील तितकेच महत्त्वाचे कारण ठरत आहे. हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम हे दोन्ही केसांच्या वाढीसंबंधीत नैसर्गिक चक्रात व्यत्यय आणतात. ज्यामुळे हळूहळू केस पातळ होतात. कोणत्याही अंतर्निहित विकाराचा शोध घेण्यासाठी, त्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी आणि दीर्घकालीन केसांच्या समस्या रोखण्यासाठी वेळीच थायरॉईड चाचण्या कराव्यात.
केसांची मुळं कमकूवत होण्याचं कारण काय?
मुंबईतील त्वचा विकार तज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे म्हणाल्या की, सध्या मोठ्या संख्येने रुग्ण केस गळतीची समस्या घेऊन रुग्णालयात उपचाराकरिता धाव घेतात. मात्र थायरॉईडच्या समस्या देखील केस गळतीस कारणीभूत ठरु शकतात याची कल्पना नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते. थायरॉईड संप्रेरके शरीरातील अनेक कार्ये नियंत्रित करतात, ज्यामध्ये केसांच्या कूपांची वाढ समाविष्ट आहे. जेव्हा थायरॉईड संप्रेरकांची पातळी बिघडते तेव्हा केसांचे मुळ कमकुवत होतात ज्यामुळे केस गळतात आणि वाढ मंदावते. रुग्णांना अनेकदा केस पातळ होणे आणि केसांची वाढ कमी होत असल्याचे दिसून येते आणि आहार आणि जीवनशैली निरोगी असली तरीही ही स्थिती कायम राहू शकते. केस गळण्याबरोबरच थकवा, वजन कमी किंवा जास्त होणे, कोरडी त्वचा किंवा छातीत धडधडणे यासारखी लक्षणे दिसून येतात जी थायरॉईडच्या मूळ समस्येचे संकेत देतात.
थायरॉईड तपासणी करणं गरजेचं
थायरॉईड तपासणी न केल्याने 40% लोकांमधील केसगळतीचे खरे कारण कळत नाही. 24 ते 37 वयोगटातील 10 पैकी 4 लोक केस गळण्याच्या तक्रारी घेऊन माझ्याकडे उपचारांसाठी येतात, या रुग्णांना थायरॉईडची समस्या आहे हे माहितच नसते. जेव्हा त्यांना थायरॉईड तपासणीचा सल्ला दिला जातो तेव्हा त्यांना कळते की केस गळण्याची समस्या ही थायरॉईडच्या समस्येमुळे होते. नियमित थायरॉईड चाचणीमुळे हे असंतुलन लवकर ओळखता येते, ज्यामुळे केसांची सामान्य वाढ पुनर्संचयित करण्यासाठी योग्य उपचार करता येतात.
केस गळती आणि थायरॉईडची गुंतागुंत टाळता येते
अपोलो डायग्नोस्टिक्स मुंबईच्या रिजनल टेक्निकल चीफ डॉ. उपासना गर्ग म्हणाल्या, केस गळणे ही थायरॉईड संतुलन बिघडण्याचे सुरुवातीचे लक्षण असू शकते, जी अनेकदा गंभीर लक्षणं दिसेपर्यंत दुर्लक्षित राहते. टिएसएच पातळी (थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन), T3, T4 आणि थायरॉईड अँटीबॉडी स्क्रीनिंग सारख्या चाचण्या थायरॉईड समस्येच्या निदानास मदत करतात. निदान झाल्यानंतर, थायरॉईड विकार हे औषधं, जीवनशैलीतील बदल आणि पूरक आहारांनी व्यवस्थापित केले जाऊ शकतात, ज्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते.
अस्पष्ट किंवा सतत केस गळण्याची समस्या असलेल्या कोणालाही वेळीच निदानासाठी या चाचण्या करता येतात. ही तपासणी करणे अगदी सोपे आहे आणि यामुळे केस गळणे आणि भविष्यातील गुंतागुंत टाळता येते. थायरॉईडचे व्यवस्थापन करण्यासाठी, पुरेसे आयोडीन, प्रथिने, लोह आणि जस्त असलेला संतुलित आहार घ्या, हायड्रेटेड रहा आणि केसांवर रासायनिक उपचार किंवा उष्णतेचा वापर करुन हेअर स्टाइल करणे टाळा. योग, ध्यान किंवा व्यायामाद्वारे तणावाचे व्यवस्थापन करा. निदान झाल्यास नियमितपणे थायरॉईड औषधांचे सेवन करा.नियमितपणे थायरॉईड आणि केसांच्या आरोग्य तपासणी करा, विशेषतः केस गळत असल्यास त्वरीत तपासणी करुन घ्या. थायरॉईड स्क्रीनिंगद्वारे वेळीच निदान, योग्य व्यवस्थापनासह, केस गळणे टाळता येते आणि केसांची आरोग्य चांगले राखता येते.