Eye Care Tips : पावसाळ्याचा आनंद घ्यायला बहुतेकांना आवडते, पण पावसासोबत काही संसर्गही येतात. त्यामुळे या ऋतूत स्वत:ला निरोगी ठेवणे हे एक आव्हान असते. पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या वाढतात. कधी कधी डोळ्यात घाण पाणी आल्याने इन्फेक्शन आणि डोळे लाल होण्यासारख्या समस्या निर्माण होतात. डोळे सर्वात संवेदनशील आणि नाजूक असतात त्यामुळे त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. पावसाळ्यात काळजी घेण्याच्या काही टिप्स जाणून घेऊया.


डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल, (मुंबई) इथल्या सल्लागार नेत्रविकारतज्ज्ञ, डॉ. स्नेहा मधुर कंकरिया सांगतात की, "पावसाळ्यात स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. डोळ्यात काही समस्या असल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांशी संपर्क साधावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांचा उपचार कधीही करु नये, असे केल्याने समस्या वाढण्याची शक्यता आहे." 


स्वच्छता राखा : पावसाळ्यात हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचे हात पुसायचे टॉवेल, नॅपकीन, रुमाल स्वच्छ आणि कोरडे ठेवा. तुमचे टॉवेल, डोळ्यांच्या मेकअपचे सामान यांसारख्या वैयक्तिक वस्तू शेअर करु नका. डोळ्यांना स्पर्श करु नका/ चोळू नका, कारण हातावर हजारो जीवाणू असू शकतात, जे तुमच्या डोळ्याला संसर्ग करु शकतात.


पाणी साचलेल्या जागा टाळा : कारण त्या ठिकाणी विषाणू, जीवाणू आणि बुरशी असू शकते.


कॉन्टॅक्ट लेन्सची काळजी घ्या : कॉन्टॅक्ट लेन्स हाताळताना नेहमी हात धुवावेत. कॉन्टॅक्ट लेन्सेस तसेच क्लीनिंग सोल्यूशनच्या एक्स्पायरीच्या तारखेवर लक्ष ठेवावे.
 
कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणे टाळावे कारण संसर्गाची जोखीम वाढलेली असते. त्याऐवजी या कालावधीत चष्मा वापरावा.
 
कंजन्क्टिव्हायटिस (डोळे येणे), रांजणवाडी, कॉर्निअल अल्सर हे सामान्यणे आढळणारे संसर्ग आहेत. डोळे लाल झाले, चिकट द्रव बाहेर येथ असेल, डोळ्यातून पाणी येत असेल, वेदना होत असतील, दृष्टी धूसर झाली असेल तर तातडीने नेत्रविकारतज्ज्ञांची भेट घ्यावी. ओव्हर द काउंटर म्हणजेच डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेणे टाळावे.


पावसाच्या धारांपासून तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करा
 
तुमच्या डोळ्यावर पाण्याचे हबके मारणे टाळावे, कारण त्यात डोळे चुरचुरवणारे घटक असू शकतात.


डोळ्यांचा संसर्ग झाल्यास हात पुसायचे टॉवेल वा नॅपकीन शेअर करु नयेत. डोळ्याला संसर्ग झाल्यास डोळ्यांना स्पर्श करू नये कारण त्यामुळे दुसऱ्या डोळ्याला आणि दुसऱ्या व्यक्तींनाही संसर्ग होऊ शकतो.


पावसाळ्यात जंक फूड खाण्याची इच्छा होत असली तरी सकस आहार घ्यावा. कारण रस्त्यावरचे पदार्थ अपायकारक असू शकतात.


डोळ्यांचा मेकअप टाळा कारण पावसाळ्यात संसर्गांसाठी तो उत्प्रेरक ठरु शकतो.