Health: मधुमेह हा केवळ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा आजार नसून संपूर्ण शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो. हृदयावर त्याचा परिणाम अधिक गंभीर मानला जातो. आजच्या घडीला जगभरातील अनेक संशोधनांमधून स्पष्ट झाले आहे की मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये हार्ट फेल्युअरचा धोका सामान्य व्यक्तींच्या तुलनेत दुप्पट ते चौपट जास्त असतो. त्यामुळे या दोन्ही अवस्थांमधील परस्परसंबंध समजून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचं मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितलं.
मधुमेह आणि हृदय विकाराच्या समस्या यांचा परस्परसंबंध असून मधुमेहींनी त्यांचे हृदय निरोगी कसे ठेवता येईल याकिरता विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. हार्ट फेल्युअर तेव्हा होते जेव्हा हृदय प्रभावीपणे रक्त पंप करू शकत नाही, ज्यामुळे थकवा येणे, दम लागणे आणि पाय किंवा गुडघ्यांमध्ये सूज येते. त्याच्या कारणांमध्ये कोरोनरी धमनी रोग, उच्च रक्तदाब किंवा कालांतराने हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते. ही स्थिती हळूहळू विकसित होते म्हणून वेळीच हृदय तपासणी करणे गरजेचे आहे.
मधुमेहामुळे येतो हृदयविकाराचा झटका
मधुमेहामुळे शरीराच्या रक्तातील साखरेचे नियमन करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. विविध अभ्यासांनुसार, कालांतराने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास हृदयावर नियंत्रण ठेवणाऱ्या रक्तवाहिन्या आणि नसांवर दुष्परिणाम होतो. कालांतराने, यामुळे रक्तवाहिन्या कडक होणे, रक्त प्रवाह कमी होणे आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. मधुमेह असलेल्या लोकांना उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाची समस्या असू शकते, ज्यामुळे भविष्यात हृदयविकाराची शक्यता वाढते.
हृदयविकाराची लक्षणांमध्ये दम लागणे, सतत खोकला येणे, पाय किंवा पोटाला सूज येणे आणि अचानक थकवा येणे यांचा समावेश आहे . त्याचप्रमाणे जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे आणि अंधुक दृष्टी यासारख्या मधुमेहाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कारण या दोन्ही स्थिती घातक ठरू शकतात.
काय करावं काय टाळावं?
मधुमेह आणि हृदयविकार यांचा परस्परसंबंध असून मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि हृदयाच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी, नियमित तपासणी करून आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचे नियमित सेवन करुन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे गरजेचे आहे. ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, डाळी आणि मसूर यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या. दररोज किमान एक तास न चुकता व्यायाम करा, धूम्रपान आणि मद्यपानाचे सेवन टाळा, योगा आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करा. दर 8 ते 10 महिन्यांनी किंवा डॉक्टरांनी सांगितल्यानुसार नियमित हृदयरोग तपासणी करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला मधुमेहाचे निदान झाले, तर तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या व कोणतीही असामान्य लक्षणं आढळल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ला घ्या.