Health Tips : आपल्यापैकी साधारणपणे प्रत्येकजण आपल्या लहान बाळाला (Child) प्लास्टिकच्या बाटलीतून (Plastic Bottle) दूध पाजतो. भारतातही बरेच लोक असेच करतात. तुम्हाला वाटत असेल की, बाळाला प्लास्टिकच्या बाटलीतून दूध (Milk) पाजणं सुरक्षित आहे. पण, हा तुमचा गैरसमज आहे. बाळाला प्लास्टिकच्या बाटलीतून दूध पाजल्याने बाळावर नेमका काय परिणाम होतो? याच संदर्भात बालरोगतज्ञ डॉ. तरुण आनंद यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुलांना प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दूध का पाजू नये आणि त्यातून मुलांना काय नुकसान होऊ शकते? या संदर्भात माहिती दिली आहे. 


तुम्हीही पालक असाल आणि तुमच्या मुलाला प्लास्टिकच्या बाटलीतून दूध पाजत असाल, तर ही माहिती नक्की वाचा. यामुळे आपल्या मुलाच्या आरोग्यास हानी टाळू शकते.






प्लास्टिकच्या बाटल्या धुणे


डॉक्टरांनी सांगितले की, एका नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, प्लास्टिकच्या बाटल्या गरम पाण्यात धुण्यासाठी ठेवल्या जातात तेव्हा त्यातून काही प्लास्टिकचे कण बाहेर पडतात जे दुधासह मुलांच्या पोटात जातात. या मायक्रोप्लास्टिक्समुळे मुलांच्या पोटाला आणि मेंदूलाही इजा होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.


हे टाळण्यासाठी काय कराल?


जर तुम्हाला या समस्येपासून सुटका हवी असेल तर हे टाळण्यासाठी डॉक्टरांनी प्लास्टिकच्या बाटल्या धुताना पाणी जास्त गरम न करण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या मते, मुलांसाठी प्लास्टिकऐवजी काचेच्या आणि स्टीलच्या बाटल्यांचा वापर करावा. डॉक्टरांनी सांगितले की बाळाला आईचे दूध किंवा फॉर्म्युला दूध देण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या कधीही गरम करू नका. 


जर, तुम्ही या संबंधित खात्री घेतली तर तुमच्या बाळाच्या आरोग्यावर तसेच मेंदूवर होणारा परिणाम लगेच टाळता येऊ शकतो. तसेच, काचेच्या बाटल्यांचा वापर केल्याने बाळाचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होईल. 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : महिलांना मासिक पाळी, गर्भधारणा आणि मोनोपॉझमुळेही होऊ शकतो मोतीबिंदू; वेळीच 'ही' काळजी घ्या