Health Tips : खरंतर, लहान बाळाच्या शारिरीक विकासासाठी आणि त्यांच्या शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी आईचं दूध हे फार गरजेचं आहे. पण,  शरीराला आवश्यक असणारं एक व्हिटॅमिन (Vitamin) असं आहे ज्याची कमतरता आईच्या दुधाने सुद्धा भरून काढता येत नाही ते म्हणजे व्हिटॅमिन डी (Vitamin D). लहान बाळाच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी हे सर्वात महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक आहे. त्याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात.


व्हिटॅमिन डी हे फॅटमध्ये विरघळणारे पोषक तत्व आहे, जे शरीरात अनेक महत्त्वाची भूमिका बजावते. हे पोषक घटक लहान मुलांसाठी गरजेचं आहे. कारण व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे मुलांच्या वाढीस अडथळा येऊ शकतो. ज्याचा भविष्यात त्यांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. खरंतर, व्हिटॅमिन डी हाडे मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. मुलांसाठी व्हिटॅमिन डी का आवश्यक आहे ते जाणून घेऊयात.


व्हिटॅमिन डीची कमतरता आईच्या दुधानेही दूर करता येत नाही


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) म्हणण्यानुसार, जन्माच्या वेळी मुलांमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी खूपच कमी असते, जी गर्भधारणेदरम्यान आईद्वारे मुलामध्ये जाते. गरोदरपणात आईमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, मुलांना देखील त्याचे प्रमाण कमी होते. पण, आईचे दूध, पूरक आहार आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने व्हिटॅमिन डीची पातळी भरून काढता येते. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे केवळ आईच्या दुधात व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळत नाही. या कारणामुळे जी मुलं फक्त आईचे दूध पितात त्यांना व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा धोका जास्त असतो.


व्हिटॅमिन डी का महत्वाचं आहे?


हाडांची ताकद वाढते


मुलांची हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे, ज्याच्या शोषणासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. त्यामुळे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांना मुडदूस होण्याचा धोका जास्त असतो. ज्यामध्ये हाडे कमकुवत आणि वाकडी होतात.


रोगप्रतिकारकशक्तीसाठी गरजेचं 


रोगप्रतिकारक शक्तीच्या चांगल्या कार्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे मुलं सहजपणे आजारांना बळी पडतात. 


मेंदूच्या विकासासाठी आवश्यक


व्हिटॅमिन डी मेंदूच्या पेशी विकसित करण्यास मदत करतात, ज्यामुळे न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांचा धोका कमी होतो. तसेच मुलांची विचार करण्याची क्षमता, तर्कशास्त्र, भाषा थोडक्यात मेंदूच्या विकासासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. 


स्नायूंची ताकद वाढविण्यास उपयुक्त


व्हिटॅमिन डी हाडे तसेच स्नायू मजबूत करण्यास देखील मदत करतात. स्नायूंच्या कमतरतेमुळे, मूल चालणे, खेळणे यांसारख्या हालचाली करताना इतर मुलांपेक्षा मागे राहू शकतात. त्यामुळे स्नायूंच्या विकासासाठी व्हिटॅमिन डी खूप गरजेचं आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : 'या' हंगामी भाज्यांमध्ये दडलाय पोषक तत्त्वांचा खजिना, आजच आहाराचा भाग बनवा; त्वचेसाठीही गुणकारी