Health Tips : असं म्हणतात की, तुमची सकाळ जशी सुरु होते तसा तुमचा पुढचा दिवस असतो. म्हणूनच, आपली सकाळ चांगल्या पद्धतीने सुरू होणं फार महत्वाचं आहे. पण, अनेकदा आपण काही चुका करतो ज्याचा आपल्या आरोग्यावर (Health) नकारात्मक परिणाम होतो. आणि आपण तितक्या सक्रियतेने काम करू शकत नाही. जर तुम्हाला तुमची सकाळ चांगली आणि आरोग्यदायी हवी असेल तर तुम्हाला तुमच्या काही सवयी बदलणं फार गरजेचं आहे. या सवयी कोणत्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नाश्ता करायला विसरू नका

बर्‍याचदा सकाळी ऑफिसच्या घाईत असताना आपण नाश्ता करायला विसरतो किंवा नाश्ता करत नाही. सकाळी नाश्ता न केल्याने तुमची एनर्जी लेव्हल कमी होते आणि तुमचा मेटाबॉलिज्म देखील मंदावतो. यामुळे, तुम्हाला दिवसभर आळस येतो आणि कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. तसेच, रिकाम्या पोटी तुमचा मूड फारसा चांगला नसतो यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. त्यामुळे रोज सकाळी नाश्ता करा. तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये फळे, कडधान्य, दूध इत्यादींचा समावेश करा.

व्यायाम करा 

दररोज सकाळी उठल्यानंतर व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करण्याचा प्रयत्न करा. व्यायाम केल्याने तुमचे आरोग्य सुधारते आणि शरीरात चांगले हार्मोन्स निर्माण होतात. ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतात आणि रक्ताभिसरणही सुधारते. ज्यामुळे अनेक आजारांना प्रतिबंध होतो.

भरपूर पाणी प्या

पाण्याच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रोज सकाळी एक ग्लास पाणी पिऊन सुरुवात करा. याशिवाय पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. त्यामुळे सकाळी कॉफी पिण्यापूर्वी पाणी प्या. 

तुमच्या दिवसाची योजना करा

अनेकदा आपण आपल्या दिवसाचे नियोजन करत नाही, त्यामुळे आपली अनेक महत्त्वाची कामे चुकतात आणि खूप ताण येतो. तणाव आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. म्हणून, दररोज सकाळी किंवा आदल्या रात्री आपल्या दिवसाचे नियोजन करा. यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि तुम्ही कामावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकाल.

सतत मोबाईल चेक करू नका  

मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल आपल्याबरोबर असतो. म्हणूनच सवयीशिवाय आपण सकाळी लवकर मोबाईल चेक करतो. ही सवय आपल्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे आपल्या मनात तणाव आणि नकारात्मक विचार येऊ शकतात. म्हणून, सकाळी तुमचा मोबाईल तपासण्याऐवजी, ध्यान करा किंवा काही संगीत ऐका.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान तणावामुळे मुलामध्ये ADHD चा वाढता धोका; गर्भवती महिला 'या' मार्गांनी तणाव कमी करू शकतात