Health Tips : लहान बाळांसाठी (Child) दात येण्याचा काळ हा सर्वात मोठा कठीण काळ असतो. या काळात त्यांना तीव्र हिरड्या दुखणे, ताप येणे किंवा शरीरात जडपणा येणे, चिडचिड होणे, रडणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दात येताना अनेकदा बाळांना उलट्या, जुलाब होणे यांसारख्या समस्यांचा देखील सामना करावा लागतो. बाळाचे दात 4 ते 7 महिन्यांत येण्यास सुरुवात होते. त्यामुळे ही प्रक्रिया फार मोठी असते. हा काळ जितका बाळासाठी कठीण आहे तितकाच तो पालकांसाठी आव्हानात्मक आहे. कारण बाळाला होणाऱ्या वेदना या पालकांसाठी फार असह्य असतात. अशा वेळी या ठिकाणी आम्ही तुम्हाला असे काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत जे केल्याने तुमच्या बाळाच्या वेदना कमी होतील.
हलक्या हाताने मसाज करा
जेव्हा लहान बाळाचे दात येऊ लागतात. अशा वेळेला त्यांच्या हिरड्या सुजतात, दात दुखू लागतात. जर तुमच्या मुलाच्या हिरड्या सुजल्या असतील किंवा तो रडत असेल तर त्याच्या हिरड्यांना हलक्या हाताने मसाज करा. तुमच्या स्वच्छ बोटाने किंवा मऊ कापडाच्या पट्टीने हिरड्यांवर हलक्या हाताने दाब द्या. यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होईल आणि मुलाला आराम मिळेल.
हिरड्या स्वच्छ करा
दात येण्याच्या प्रक्रियेदरम्यान मुलांसाठी हिरड्या स्वच्छ करणे खूप महत्वाचं आहे. हिरड्यांवर अन्नाचे कण आणि बॅक्टेरिया जमा झाल्याने दात काढताना संसर्ग आणि जळजळ होऊ शकते. त्यामुळे पालकांनी दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी बाळाच्या हिरड्या स्वच्छ कराव्यात. सुती कापड पाण्याने ओले करून मुलाच्या हिरड्यांना चोळा. यामुळे मुलाला आराम मिळेल आणि योग्य दात येण्यास मदत होईल.
गाजर चघळायला द्या
मुलांना दात येत असताना त्यांना काहीतरी चावल्यासारखे वाटते कारण असे केल्याने त्यांना आराम मिळतो. अशा वेळी तुम्ही मुलांना गाजर चघळण्यासाठी देऊ शकता. कारण गाजर कडक असतात. मात्र, पालकांनी सावध राहावे. जेव्हा तुम्ही मुलाला गाजर द्याल तेव्हा मूल चुकून गाजराचा तुकडा गिळणार नाही किंवा तो त्याच्या घशात अडकणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. हे लक्षात घेऊन गाजर चघळल्याने मुलांना दात येताना आराम मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.