मुंबई : देशातील अनेक भागांत आज हरतालिका तृतीया साजरी करण्यात येते. हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात. यादिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते.
हरतालिका तृतीया दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरी केली जाते. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा व्रत करतात. यादिवशी महिला दिवसभर काहीच खात नाहीत. त्यामुळे हरतालिकेचा उपवास सर्वात कठिण उपवासांपैकी एक मानला जातो.
यंदा 21 ऑगस्ट 2020 रोजी म्हणजेच आज देशभरात हरतालिका साजरी केली जाते. वैवाहिक महिलांसोबतच कुमारीका सुद्धा हरतालिकेचा उपवास करतात. हा व्रत केल्यानं मनासारखा जोडीदार मिळतो, असं सांगितलं जातं. त्यामुळे कुमारीका सुद्धा हे व्रत करतात.
पुजेची वेळ
भाद्रपद शुक्ल तृतियेला म्हणजेच 21 ऑगस्टला हरतालिकेच्या पूजेसाठी योग्य मुहूर्त सकाळी 6.18 मिनीटांपासून तर रात्री 1.58 मिनीटांपर्यंत आहे. तर २२ ऑगस्टला सकाळी शिव-पार्वतीच्या मातीच्या मूर्तीचं (पिंडीचं) विसर्जन करून महिला हा व्रत पूर्ण करतील.
भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने केलं होतं व्रत
हरतालिका तृतीया साजरी करण्यामागे अशी अख्यायिका आहे की, भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने सर्वात आधी हरतालिकेचं व्रत केलं होतं. हरतालिका दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द आहे. एक हरत आणि दुसरं आलिका. यामध्ये हरत चा अर्थ होतो अपहरण आणि आलिका चा अर्थ होतो सहेली. हे दोन शब्द एकत्र येऊन हरतालिका हा शब्द तयार झाला आहे.
हरतालिकेची एक पौराणिक कथा आहे. यानुसार, पार्वतीच्या मैत्रिणी तिचं अपहरण करून तिला जंगलात घेऊन गेली होती. पार्वतीच्या इच्छेव्यतिरिक्त भगवान विष्णुने तिच्याशी विवाह करू नये म्हणून तिच्या मैत्रिणी तिला जंगलात घेऊन जातात. तिथे देवी पार्वतीने भगवान शंकराची आराधना केली आणि भाद्रपद शुल्क तृतीयेच्या दिवशी मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पुजा केली. पार्वतीच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने देवी पार्वतीचा पत्नी म्हणून स्विकार केला.