Ganesh Chaturthi 2024 Travel : गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि... गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि... सध्या गणेशोत्सव निमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण दिसून येतंय. हिंदू धर्मासाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. लंबोदर, गणपती, विनायक, एकदंत, विघ्ननाशक आणि विनायक अशा विविध नावांनी भगवान गणेशांना ओळखले जातात. देशात गणेशाची अनेक मंदिरं आहेत, ज्याबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. परंतु तुम्हाला माहित आहे का? देशात असे एक गणेश मंदिर आहे, जिथे भगवान विष्णूंचे 10 वे अवतार मानल्या जाणाऱ्या 'कल्कि' अवतारात भगवान गणेशाची पूजा केली जाते. कल्की अवतारात पूजलेल्या या मंदिरात दररोज हजारो भाविक येतात. आज आम्ही तुम्हाला या मंदिराशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.


 


कल्की गणेश मंदिर कुठे आहे?


कल्की गणेश मंदिराशी संबंधित रंजक गोष्टी जाणून घेण्यापूर्वी, हे मंदिर मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील मदन महलच्या रतन नगरमध्ये कल्की मंदिर आहे. कल्की गणेश मंदिराला 'सुप्तेश्वर गणेश मंदिर' या नावानेही अनेकजण ओळखतात. हे मंदिर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून सुमारे 311 किमी आणि विदिशापासून सुमारे 261 किमी अंतरावर आहे.


 


कल्की गणेश मंदिराशी संबंधित अनेक रंजक गोष्टी


कल्की म्हणजेच सुप्तेश्वर गणेश मंदिराशी एकच नाही, तर अनेक रंजक गोष्टी निगडित आहेत. हे देशातील एकमेव असे मंदिर मानले जाते, जेथे कल्कीच्या रूपात गणेशाची पूजा केली जाते. कल्की गणेश मंदिर हे एक असे मंदिर आहे. जेथे भगवान गणेश 25 फूट विशाल खडकात विराजमान आहेत. हा महाकाय खडक सुमारे 100 चौरस फूट परिसरात आहे. मंदिर परिसरात दिवे लावण्याची कथा भाविकांना आकर्षित करते.


 


सर्व मनोकामना पूर्ण होतात... भाविकांची श्रद्धा


कल्की गणेश मंदिर आजूबाजूच्या परिसरात त्याच्या चमत्कारिक कथा आणि पौराणिक कथांसाठी एक पवित्र स्थान मानले जाते. या मंदिराविषयी असे म्हटले जाते की, जो व्यक्ती सिंदूर लावून खडकाची प्रदक्षिणा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. कल्की गणेश मंदिराबाबत आणखी एक मान्यता अशी आहे की, जो भक्त 41 दिवस मंदिराजवळ दिवा लावून पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे अनेकजण येथे दिवा लावण्यासाठी येत असतात.





कल्की गणेश मंदिरात कसे जायचे?



  • कल्की गणेश मंदिर म्हणजेच सुप्तेश्वर गणेश येथे पोहोचणे खूप सोपे आहे. 

  • मध्य प्रदेशातील कोणत्याही शहरातून जबलपूरला पोहोचू शकता

  • जबलपूरहून टॅक्सी, ऑटो आणि कॅब घेऊन कल्की गणेश मंदिर गाठू शकता. 

  • हे मंदिर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून सुमारे 311 किमी

  • विदिशापासून सुमारे 261 किमी अंतरावर आहे. 

  • या दोन्ही ठिकाणांहून रेल्वे, बस किंवा टॅक्सीने कल्की गणेश मंदिरात जाता येते.


 


गणेशोत्सवाला गर्दी


कल्की गणेश मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात, परंतु गणेश उत्सवाच्या निमित्ताने ते सर्वाधिक दिसून येते. विशेषत: गणेश चतुर्थीनिमित्त येथे सर्वाधिक गर्दी दिसून येते. गणेश उत्सवानिमित्त या मंदिराला दिव्यांनी आणि फुलांनी सजवले जाते. या विशेष प्रसंगी मंदिराभोवती प्रचंड जल्लोष पाहायला मिळत आहे. मंदिराभोवती खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले आहेत.


 


हेही वाचा>>>


Ganeshotsav Travel : 'सृष्टीच्या कणाकणात आहे माझा श्रीगणेश!' केवळ भारतातच नाही तर परदेशातही गणेशाची 'ही' मंदिरं माहित आहेत? मनोकामना होते पूर्ण


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )