Ganesh Chaturthi 2022 : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ म्हणत सगळीकडेच गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. आपल्यापैकी अनेकांच्या घरी आज मंगलमूर्ती श्रीगणेशाचं (Ganesh Chaturthi 2022) आगमन झालं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा तब्बल 2 वर्षांनंतर सगळीकडे जल्लोषाचा माहोल पाहायला मिळत आहे, कोरोनानंतर आता लोकांमध्ये निसर्गाविषयी देखील जागरूकता निर्माण झाली आहे. दरवर्षी बाप्पाच्या सजावटीत वापरले जाणारे थर्माकॉल, प्लास्टिक आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या इतर अनेक घटकांचा वापर यंदा कमी झाला आहे. अनेकांनी यंदा बाप्पासाठी अगदी पर्यावरणपूरक ताज्या फुलांची आरास (Ganpati Decoration) किंवा सजावट करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही देखील घरच्या बाप्पासाठी रोज ताजी फुलं वापरणार असाल, तर ‘या’ डेकोरेशन आयडिया खास तुमच्यासाठी...


झेंडूची फुले


झेंडूच्या फुलांचा केशरी रंग मनाला मोहवणारा असतो. तुम्हालाही झेंडूची फुले आवडत असतील, तर बाप्पाच्या सजावटीमध्ये या फुलांचा वापर करू शकता. यासाठी गणपती मूर्तीच्या चारही बाजूंनी एक फ्रेम बनवा. नंतर या फ्रेमभोवती केशरी झेंडूच्या फुलांची माला गुंडाळा आणि संपूर्ण टेबल या फुलांनी झाकून टाका. केशरी रंगाच्या फुलांसोबतच तुम्ही पिवळ्या रंगाची फुले देखील वापरू शकता. शिवाय ही फुले सुकल्यानंतर त्यांचे खत तयार करू शकता.


पांढरे गुलाब


पांढर्‍या गुलाबाला विशेष महत्त्व आहे. पांढरा रंग ज्याप्रमाणे शुद्धता, साधेपणा आणि निष्ठा यांचे प्रतीक आहे, त्याचप्रमाणे हे गुलाब देखील शांततेचे प्रतीक आहे. या फुलांचा उपयोग गणपती बाप्पाच्या सजावटीत करता येतो. पांढऱ्या गुलाबाने बाप्पाची सजावट करताना हिरवी पाने किंवा इतर एखाद्या रंगाची फुले वापरण्यास विसरू नका. त्यामुळे पांढरा गुलाब अधिक सुंदर आणि उठून दिसतो.


ऑर्किड आणि गुलाब


गुलाब आणि ऑर्किडची फुलं वापरून देखील गणपती बाप्पाची सुंदर सजावट करता येईल. या फुलांनी गणपतीची आरास आणखी सुंदर दिसेल. ऑर्किड हे सौंदर्य, आकर्षण आणि प्रेमाचे प्रतीक आहे. गुलाब हे धैर्य आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. या फुलांचे कॉम्बिनेशनही खूप सुंदर दिसते.


पिवळा झेंडू आणि आंब्याची पाने


आपल्याकडे कोणताही सण असो, आंब्याच्या पानांना विशेष महत्त्व दिले जाते. प्रत्येक पूजेत या पानांचा समावेश असतो. हिरवा रंग धन देवतेला आकर्षित करतो, असे म्हटले जाते. तर पिवळा रंग आनंद, आशा आणि बुद्धीशी संबंधित आहे. हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते.


संबंधित बातम्या


Ganesh Chaturthi Recipes : गणपतीला दाखवा खास पण वेगळे नैवेद्य, मखान्यापासून मोदक बनवण्याची सर्वात सोपी पद्धत


Ganesh Chaturthi 2022 Chocolate Modak : बाप्पाचं स्वागत करा चॉकलेट मोदकाने; जाणून घ्या कृती...