न्यूयॉर्क: स्मार्टफोन आणि गॅजेट्सच्या अधिक वापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक स्वास्थ्याशी निगडीत काही समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे त्यांचं वागणं, राहणं यामध्येही फरक पडू शकतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून ही गोष्ट समोर आली आहे. तज्ज्ञांचं म्हणणं काय? अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठाचे मेडेलीन जॉर्ज यांनी यावर एक संशोधन केलं आहे. त्यांच्या मते, किशोरवयीन मुलांनी स्मार्टफोन किंवा गॅझेटचा अधिक वापर केल्यास त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ते कोणत्याही एक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करु शकत नाही. यासोबतच त्यांच्यामध्ये हायपर अॅक्टिव्हिटी डिस्ऑर्डरची लक्षणं दिसू लागतात. हे संशोधन 'चाइल्ड डेव्हलपमेंट' या मासिकात प्रकाशित झालं आहे. यामध्ये किशोरवयीन मुलांच्या मानसिक स्वास्थ्याशी निगडीत लक्षणं दाखवली आहेत. यामध्ये त्यांच्या दररोजच्या सोशल मीडिया आणि इंटरनेट वापराचा वेळही समाविष्ट करण्यात आला आहे. असं करण्यात आलं संशोधन: या संशोधनात 151 किशोरवयीन मुलांच्या स्मार्टफोन वापराचा अभ्यास करण्यात आला. दिवसातून तीनदा त्यांचा सर्व्हे करण्यात आला. महिनाभर हे परिक्षण सुरु होतं. त्यानंतर 18 महिन्यानंतर त्यांच्या मानसिक स्वास्थ्याचं मूल्यांकन केलं गेलं. यामध्ये 11 ते 15 वर्षातील मुलं सहभागी झाले होते. या मुलांनी दिवसातील 2.3 तास स्मार्टफोन किंवा गॅझेट वापरण्यासाठी खर्च केला. संशोधनातील निष्कर्ष: जेव्हा मुलांनी स्मार्टफोन आणि गॅझेटचा जास्त वापर केल्या तेव्हा त्यांच्या वागण्यात काही गोष्टी आढळून आल्या. उदा. खोटं बोलणं, मारामारी करणं आणि इतर व्यवहारिक समस्याही दिसून आल्या. स्मार्टफोनचे फायदे: दरम्यान, संशोधनकर्त्यांना स्मार्टफोन वापरातील काही सकारात्मक गोष्टी आढळून आल्या आहेत. जेव्हा किशोरवयीन मुलांनी स्मार्टफोनचा जास्त वापर केला तेव्हा त्यांच्यात डिप्रेशन आणि चिंता यांची लक्षणं कमी दिसून आली.