सलग अर्धा तास फोनवर बोलल्याने ब्रेन ट्यूमरचा धोका
एबीपी माझा वेब टीम | 01 Oct 2018 10:38 AM (IST)
तुम्ही सलग अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ फोन कानाला लावून बोलल्यास दहा वर्षांनी तुम्हाला ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता दुप्पटीने वाढते. आयआयटी मुंबईचे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी एका अभ्यासाच्या आधारावर हा दावा केला आहे.
मुंबई : स्मार्टफोन ही अनेकांची मुलभूत गरज बनली आहे. हातात काही मिनिट फोन नसेल तर काही जण सैरभैर होतात. पण जास्त फोन वापरणं धोकादायक बनत चाललं आहे. हे आपल्याला फोन वापरताना जाणवत नसेल, पण हा जास्तीचा वापर आता जीवघेणा ठरत चालला आहे. ब्रेन ट्यूमरचा धोका स्मार्टफोनच्या अतिवापराने शरीराचं मोठं नुकसान होतं. डोळ्यांवर परिणाम होतो, रात्रभर झोप न येणे, गॅजेट अॅडिक्शन अशा त्रासांना सामोरं जावं लागतं. आता असं म्हटलं जात आहे, की तुम्ही सलग अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ फोन कानाला लावून बोलल्यास दहा वर्षांनी तुम्हाला ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता दुप्पटीने वाढते. आयआयटी मुंबईचे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी एका अभ्यासाच्या आधारावर हा दावा केला आहे. देशातील अनेक ईएनटी (कान, नाक, घसा) स्पेशालिस्टसोबत बातचीत केल्यानंतर एक अहवाल प्रकाशित केला असल्याचं गिरीश कुमार यांचं म्हणणं आहे. बहिरेपणा आणि ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा उल्लेख या संशोधनामध्ये करण्यात आला आहे. जास्त वेळ फोनवर बोलल्यामुळे कान गरम होतात, असं सर्वेक्षणातील अनेकांनी मान्य केलं. सलग 20 ते 30 मिनिट फोनवर बोलल्यानंतर मायक्रोवेव्ह रिडेएशन्स शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे कानाच्या पाळीचं रक्त गरम होतं. रक्ताच्या तापमानात एक डिग्री सेल्सियसची वाढ होते. फोनवर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बोलल्यानंतर डोकेदुखीची समस्या सुरु होते. त्यानंतर ब्रेन ट्यूमरच्या अंतिम टप्प्याचे लक्षणं दिसून येतात, असं संशोधनात म्हटलं आहे.