Matheran: माथेरानमध्ये (Matheran) पावसाळा सुरू झाला असून वातावरण हिरवंगार झालं आहे, हे पाहण्यासाठी तसेच पावसाचा आनंद (Monsoon Tourism) लुटण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढल्याने माथेरानमधल्या छोटेखाणी व्यवसायाला चालना मिळाली आहे. माथेरानमधील आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक माथेरानला भेट देत आहेत. मागील पाच दिवसांपासून माथेरान मध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून संततधार सुरूच आहे. माथेरानमध्ये बुधवारी (28 जून) एकूण 56.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत 503.8 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.


माथेरानला पावसाची खऱ्या अर्थाने सुरुवात ही जुलै महिन्यापासून होत असते. मात्र यंदा जून महिन्याच्या अखेरीस पावसाने दमदार बॅटिंग सुरू केली असून पावसात चिंब भिजण्याचा आनंद घेताना पर्यटक दिसत आहेत. हौशी पर्यटक हे घोडेस्वारीच्या माध्यमातून पॉईंट्सची सैर करताना दिसत आहेत. तर काही बाजारपेठांमध्ये मिळणारा गरमागरम मका, चहा आणि भजीचा आस्वाद घेण्यात मग्न आहेत. माथेरानच्या हिरवागार निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी पर्यटक पावसाळ्यात इथे येणं अधिक पसंत करतात, त्यामुळेच पावसाळ्यात इथल्या सर्वच व्यावसायिकांना उत्तम प्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.


पावसाळ्यात माथेरानमध्ये ट्रेकिंग करण्याची आणि तिथलं वन सौंदर्य पाहण्याची मज्जाच वेगळी असते. पावसामुळे माथेरानचा संपूर्ण माथा हा घनदाट झाडी आणि लाल पायवाटांनी भरलेला आहे. शार्लोट लेक, पॅनारोमा पॉईंट, लुईझा पॉईंट, सनसेट पॉईंट अशा अनेक ठिकाणांवरुन दिसणारी डोंगरदऱ्यांची दृश्य मनाला भुरळ घालतात. मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांसाठी माथेरान हे सोयीचं ठिकाण आहे. माथेरानच्या माथ्यावर राहण्याची सोय देखील आहे. विविध हॉटेल्समध्ये तुम्ही राहायला देखील जाऊ शकता. पर्यावरणमुक्त हिल स्टेशन अशी ओळख असलेल्या माथेरानमध्ये पर्यटक सुट्टीचा खरा आनंद घेण्यासाठी येत आहेत.


पावसाचा आसमंत अनुभवण्यासारखी इतरही ठिकाणं


लोणावळा, खंडाळा


पुणे-मुंबई महामार्गावर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावर असलेली ही थंड हवेची ठिकाणं आहेत. मुंबई-पुण्यात राहणाऱ्यांसाठी हे ठिकाण एकदम सोयीचं पर्यटनस्थळ आहे. टायगर पॉईंट, लायन पॉईंट, भुशी डॅम, वाळवळ डॅम ही लोणावळ्यातील प्रसिद्ध ठिकाणं आहेत. लोणावळा-खंडाळ्याचा हिरवागार निसर्ग, थंड हवा, डोंगरमाथ्यावरुन कोसळणारे धबधबे आणि दाट धुकं ही पर्यटकांना आकर्षित करणारी बाब आहे.


माळशेज घाट


माळशेज घाटाचं निसर्ग सौंदर्य हे पावसाळ्याच्या दिवसांत आणखी खुलतं. या पावसाळ्यात तुम्हाला खरी मजा घ्यायची असेल तर माळशेज घाटाला नक्की भेट द्या. पावसाच्या सरी अंगावर झेलत आणि ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूपच मजा वाटते. ना शहर ना गाव, फक्त हिरव्यागार झाडांमधून जाणारा घाट रस्ता, ही आहे माळशेज घाटाची ओळख. पावसाळ्यात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी माळशेज घाट हे एक ठिकाण आहे. 


इगतपुरी


रस्त्यालगत धबधबे, हिरव्यागार पर्वतरांगा आणि थंड वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर इगतपुरी हे एक उत्तम ठिकाण आहे. विविध धरणं आणि धबधब्यांचं हे माहेर घर आहे. इगतपुरीचा उल्लेख फॉग सिटी असा देखील केला जातो. पावसाळ्यात इगतपुरीचं वातावरण मनमोहक असतं. निसर्गप्रेमींसाठी हे आश्रयस्थान आहे. पावसाळा आला की भंडारदरा धरण, कळसूबाई शिखर, भावली धरण, भावली धबधबा, सांधण व्हॅली, कसारा घाट ही काही स्थळं पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.


हेही वाचा:


Monsoon Trekking: पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्याचा विचार करताय? मग 'या' सात गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या