Black Tea Benefits : मधुमेहाचा (Diabetes) आजार हा आता सामान्य झाला आहे. मधुमेहाचा आजार हा जगात झपाट्याने पसरणारा आजार आहे. या आजाराचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली (Lifestyle). अशा परिस्थितीत, युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ डायबिटीजच्या वार्षिक बैठकीत सादर केलेल्या नवीन संशोधनात असे म्हटले आहे की, नियमितपणे ब्लॅक टी (Black Tea) प्यायल्याने मधुमेह 2 मध्ये बराच आराम मिळू शकतो. या संशोधनात असे म्हटले आहे की, मधुमेहाच्या रुग्णांनी ब्लॅक टीचे सेवन केल्यास त्यांच्या शरीरातील रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास खूप मदत होते. ब्लॅक टीचे सेवन केल्याने आणखी काय काय फायदे आहेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
मधुमेहाचा धोका कमी होतो
संशोधनात केलेल्या अभ्यासानुसार, ब्लॅक टी (Black Tea) न पिणाऱ्या आणि ब्लॅक टी पिणाऱ्यांच्या शरीरातील रक्तातील साखरेचे संतुलन तपासण्यात आले. अशा परिस्थितीत, जे लोक नियमितपणे ब्लॅक टी पितात त्यांच्यामध्ये प्री डायबिटीजचा धोका घटक ब्लॅक टी न पिणाऱ्यांच्या तुलनेत 53 टक्के कमी असल्याचे आढळून आले. याबरोबरच, ब्लॅक टी न पिणाऱ्यांमध्ये मधुमेह 2 चा जोखीम घटक ब्लॅक टी पिणाऱ्यांपेक्षा 47 टक्के जास्त होता. या अभ्यासात दोन्ही गटांमधील बीएमआय, लिंग, व्यक्तीचा रक्तदाब, हृदयाची स्थिती, कोलेस्ट्रॉलचे सेवन, धूम्रपान स्थिती आणि मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास यांचाही अभ्यास करण्यात आला.
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त
अभ्यासात असे म्हटले आहे की, जे लोक ब्लॅक टीचे नियमित सेवन करतात, त्यांच्या शरीरात इन्सुलिनची पातळी जास्त राहते आणि शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करणे सोपे होते. यामुळे, मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे खूप सोपे होते. याबरोबरच ब्लॅक टी शरीरातील चयापचय क्रिया वाढवते आणि त्यातील दाहक-विरोधी गुणधर्मांचाही शरीराला फायदा होतो. ब्लॅक टी मध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडेंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढवतातच पण त्याचबरोबर अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण करतात. ब्लॅक टी शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचे काम करते, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :