मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळं काही गोष्टी अगदी अंगवळणी पडल्या. सॅनिटायझरचा वापस करणं, ही त्यापैकीच एक बाब. घरातून बाहेर पडतेवेळी असो किंवा मग कोणा पाहुण्यामंडळींच्या अथवा कोणा एका मित्राच्या घरी गेलेलं असो सॅनिटायझरचा वापर आपण हमखास करतो. प्रवासातही ही परिस्थिती काही वेगळी नाही. पण, तुम्हाला माहितीये का सॅनिटायझरचा असा वापर करतेवेळी एक लहानशी चूकही तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते.
किंबहुना अशा काही घटनाही घडल्या आहेत, ज्यामध्ये अनेकांना सॅनिटायझरच्या वापरादरम्यान झालेल्या दुर्घनांमध्ये दुखापत झाली आहे. सॅनिटायझरमध्ये असणारं ज्वलनशील अल्कोहोल हे या दुर्घटनांमागचं मुख्य कारण ठरलं आहे. चला तर, मग प्रवासात अथवा तुमच्या कारमध्ये सॅनिटायझरचा वापर करतेवेळी नेमकी कोणती काळजी घ्यायची हे पाहूया.
- सॅनिटायझरचा वापर करतेवेळी कोणतीही गरम वस्तू त्याच्या संपर्कात नाही ना यावर लक्ष द्या.
- कारमध्ये असताना सिगरेटचा वापर करतेवेळी सॅनिटायझरचा वापर जाणीवपूर्वक टाळा.
- कारमध्ये कोणत्याही खणात सॅनिटायझर माचिस अथवा लाइटरसोबत ठेवू नका.
- सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असल्या कारणानं ते सहजा थंड जागेवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळं कारमध्ये सॅनिटायझर ठेवताना कारमधील तापमानाचाही अंदाज घ्यावा.
- कारच्या विंडशील्समोर सॅनिटायझर ठेवू नये. ते अशा ठिकाणी ठेवावं जिथं सूर्यकिरणांचा थेट संपर्क येत नाही.
- कारमध्ये इतर कोणत्याही ठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यापेक्षा ते एखाद्या बॅगमध्ये ठेवा. शिवाय कारमध्ये सॅनिटायझरचा सततचा वापरही टाळा.